Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Satara › सातारा पीएनपी मेटलाईफ हिल हाफ मॅरेथॉनसाठी सज्ज

सातारा पीएनपी मेटलाईफ हिल हाफ मॅरेथॉनसाठी सज्ज

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:29PMसातारा  : प्रतिनिधी

जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेल्या सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेचे हे 7 वे वर्ष असून स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान देश विदेशातील स्पर्धक सातार्‍यात दाखल झाले आहेत. एकूण 7 हजार स्पर्धक यात सहभागी होणार असून सातारकरांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

शनिवार, दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भव्य एक्सपोचे आयोजन केले आहे. यावर्षीच्या स्पर्धेचा एक्स्पो शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या भव्य एक्सपोचे उदघाटन शनिवारी सकाळी 8.30 वाजता सातारचे आ. शिवेंद्रराजे भोसले व सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या एक्सपोमध्ये धावपटूंना आवश्यक ते सर्व रेस किट वितरित करण्यात येणार आहे. स्वतःचा फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे. 
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेसाठी प्रशासनासह विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी देखील कंबर कसली असून, याबरोबरच यवतेश्‍वर व सांबरवाडी ग्रामस्थांनी देखील जोरदार तयारी केली आहे. स्पर्धेचा शुभारंभ रविवार, दोन सप्टेंबरला सकाळी 6 वाजता तालीम संघ मैदान येथून होणार आहे. स्पर्धेसाठी येताना स्पर्धकाने आपला बीब आणणे आवश्यक आहे. 

या स्पर्धेचा प्रारंभ तालीम संघ मैदान येथून होणार असून ही स्पर्धा कमानी हौद, देवी चौक मार्गे राजपथ, मोती चौक, राजवाडा व पुढे गोल मारुती मंदिर मार्गे, यादोगोपाळ पेठेतून समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्‍वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे गणेश खिंडीच्यापुढील पठारापर्यंत जाईल. तिथून ही स्पर्धा पुन्हा त्याच मार्गाने परत प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे यवतेश्‍वर घाटातून, बोगदा, समर्थ मंदिर मार्गे अदालत वाडा, केसरकर पेठ, नगरपालिका, दिग्विजय चौकमार्गे येऊन पुन्हा तालीम संघ येथे समाप्त होणार आहे. मुख्य स्पर्धेनंतर होणारी या वर्षीची धमाल रन अर्थात ‘हिरो’ज रन ही असणार आहे. या ‘हिरो’ज रनच्या निमित्तानं सर्व स्पर्धकांनी वेगवेगळ्या नायक व नायिका यांच्या वेशभूषा करून येणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी 18 वेगवेगळी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. या हिरोज रनचा प्रारंभ तालीम संघ मैदान येथून होईल. त्यानंतर ही स्पर्धा कमानी, हौद, देवी चौक, मोती चौक, राजवाडा, यादोगोपाल पेठेतील गोल मारुती मंदिरामागे जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेपर्यंत असून पुन्हा त्याच मार्गाने तालीम संघ मैदान येथे या स्पर्धेची सांगता होणार आहे. पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 21.1 कि.मी. अंतराच्या या स्पर्धेच्या मार्गावर आठ ठिकाणी स्पर्धकांसाठी मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.