Mon, May 27, 2019 00:42होमपेज › Satara › सातार्‍यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा

सातार्‍यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 11:45PMसातारा : प्रतिनिधी

देशात दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्‍वासन सरकारने पाळले नाही. कौशल्य विकास योजनेत काम करणार्‍या संस्थांना एक पैसाही दिला नाही. बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने गंभीर दखल घेवून तातडीने उपाययोजना करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

राष्ट्रवादी युवक कँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष तेजस शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकींची रॅली काढली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, देशात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, त्याप्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिले जात नाहीत. डी.एड्., बी. एड्. झालेल्या युवकांच्या नोकर्‍यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. तेजस शिंदे म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी रोजगार निर्मिती करण्याचे अश्‍वासन सरकारने दिले होते. मात्र, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर सरकार गंभीर नाही. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंतप्रधानांनी मागील निवडणुकीवेळी वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, सरकारने 2 हजार नोकर्‍याही दिलेल्या नाहीत. निव्वळ निवडणुकीपुरता बेरोजगार युवकांचा वापर करुन त्यांना खोटी आमिषे दाखवली. नोटाबंदी, जीएसटी यामुळे देशातील उद्योग व्यापार बंद पडले. त्यामुळे शिकलेल्या आयआयटी झालेल्या इंजिनियरपासून आयटीआय मेकॅनिकपर्यंत युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.

त्यातच पुन्हा पंतप्रधानांनी आणलेल्या कौशल्य विकास योजनेतूनही युवकांना रोजगार मिळू शकला नाही. कौशल्य विकास योजनेच्या राज्यामध्ये 7 हजार 252 प्रशिक्षिण संस्था असून या संस्थांना सरकारने एकही पैसा दिलेला नाही. त्यामुळे 55 हजार कर्मचार्‍यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. सरकारी नोकरभरती टाळून शासनाने युवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आणली आहे. रोजगार प्रशिक्षण देणारा, रोजगारा मागणारा, रोजगार देणारा, असा कुणीच जगला नाही.  

या मोर्चाच्या मागण्यांची गंभीर दखल घेवून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अन्यथा राष्ट्रवादी युवक कँाग्रेसच्यावतीने भविष्यात मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही दिला आहे.  यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.