Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Satara › सातार्‍यात राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार 

सातार्‍यात राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमॅच्युअर सायकलिंग असोशिएशन ऑफ सातारा आणि आ. शिवेंद्रराजे भोसले मित्रसमुहाच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय साहसी सायकल 
स्पर्धेत घाटाचा राजा हा किताब अरविंद पनवर यांनी पटकावला. या स्पर्धेच्या निमित्ताने सातारकरांनी सायकल  स्पर्धेचा थरार अनुभवला. सातारा ते  मेढा या मार्गावरील स्पर्धेत आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि रुद्रनिलराजे भोसले सहभागी झाल्याने स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.  

महाराष्ट्र राज्य सायकलींग असोशिएशनचे उपाध्यक्ष अविनाश कदम यांच्या नियोजनातून सोमवारीच स्पर्धेची तयारी पूर्ण झाली होती. मंगळवारी सकाळी 6 वाजता साता-यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथून स्पर्धेस आ. शिवेंद्रराजे भोसले आणि उद्योजक अजित मुथा व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.  स्पर्धेसाठी सातारा ते मेढा, महाबळेश्‍वर आणि  महाबळेश्‍वरहून पाचगणी, वाई मार्गे पुन्हा सातारा असे मार्ग होते. स्पर्धेत देशाच्या विविध भागातील 300 सायकलस्वार सहभागी झाले होते.  

महाबळेश्‍वरच्या डोंगरद-या पार करताना सायकलपटूंचा चांगलाच कस लागला. सातारा ते मेढा या मार्गावर स्थानिक स्पर्धक मोठया संख्येने सहभागी झाले होते. या मार्गावर आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले, रुद्रनिलराजे भोसले सहभागी झाले होते. स्पर्धा मार्गालगतच्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला.  छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलातून स्पर्धेला सुरुवात झाली. 

स्पर्धेचा समारोप कुपर कॉलनी कदम बाग येथे झाला. हौशी स्पर्धकांसाठी सातारा ते मेढा सायकलींग स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात सातारकर मोठया संख्येने सहभागी झाले होते. त्यात अव्दैत दिक्षित (पुणे), धैर्यशील पाटील (सातारा), डॉ. प्रतिक भोईटे  फलटण) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. सातारा ते महाबळेश्‍वर या मार्गासाठी अरविंद पनवर, मनोहर लाल, अनिल मंगलो यांनी तर सातारा ते महाबळेश्‍वर आणि वाई मार्गे पुन्हा सातारा या मार्गावर दिनेश कुंभार, बजरंग डेलू, गणेश पवार यांनी क्रमांक पटकावले.

घाटाचा राजा हा किताब अरविंद पनवर यांनी पटकावला. विजेत्यांना 6 लाख 66 हजारांची बक्षीसे देण्यात आली. सातारा मेढा सातारा पहिल्या 3 क्रमांकाना चषक देण्यात आले. स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला मेडल देण्यात आले. स्पर्धा पूर्ण करणार्‍यांतून लकी ड्रॉ काढून 3 रेसर सायकल भेट देण्यात आल्या.  स्पर्धेसाठी जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायकलींग असोशिएशनचे उपाध्यक्ष अविनाश कदम, आ. शिवेंद्रराजे भोसले मित्र समूह आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयत्न केले. पारितोषिकांचे वितरण आ. शिवेंद्रराजे भोसले, आशियाई सायकलिंग फेडरेशनचे सेक्रेटरी ओंकार सिंग, नॅशनल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया सेक्रेटरी व्ही.एन. सिंग, नॅशनल सायकलिंग असो.सहसेक्रेटरी गजेन गानला, सायकलिंग असो. महाराष्ट्र प्रताप जाधव, सायकलिंग असो.महाराष्ट्राचे आजीव सदस्य विजय जाधव व नॅशनल सायकलिंग असो.चे सर्व सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 

 

 

tags ; Satara,news, National, cycle, competition, in Satara,


  •