Fri, May 24, 2019 02:46होमपेज › Satara › नक्षत्र महोत्सव उपक्रम स्तुत्य : जिल्हाधिकारी

नक्षत्र महोत्सव उपक्रम स्तुत्य : जिल्हाधिकारी

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:26PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात आजपर्यंत पाहिलेला सर्वांत मोठा ‘नक्षत्र महोत्सव’ आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून श्री. छ. सौ. दमयंतीराजे यांनी महिलांनी दिलेला पाठिंबा प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे. महिलांनी पुढे येवून स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. महिला बचतगटांना अनुदान दिले असून उद्योग, व्यवसायांना बँकांतर्फे कर्ज मिळवून द्यायला सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.

जि. प. मैदानावर आयोजित केलेल्या नक्षत्र महोत्सवासाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास नक्षत्र महोत्सवाच्या अध्यक्षा श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख,  उपाध्यक्षा सौ. स्मिता घोडके प्रमुख उपस्थित होत्या. श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले म्हणाल्या, जिल्ह्यातील महिलांना आधार मिळावा, महिलांसाठी काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने 12 वर्षांपूर्वी ‘नक्षत्र महोत्सवा’ला सुरुवात झाली. आम्ही सर्वांनी मिळून  पहिल्या वर्षी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ‘नक्षत्र महोत्सव’ सुरु केला.

त्यानंतर महिलांचा, बचगटांचा उदंड प्रतिसाद  मिळत गेला.  स्टॉलधारकांना चांगली बाजरपेठ उपलब्ध होत असल्याने वर्षानुवर्षे चांगला प्रतिसाद मिळत आहे.  महिलांच्या अडचणी महिलाच समजू शकतात. घर सांभाळणे आणि नोकरी करणे एवढेच पर्याय महिलांसमोर असतात. नवा उद्योग सुरु  करताना महिलांच्या मनामध्ये अनामिक भीती असते. अशा महिलांसाठी ‘नक्षत्र’ हा चांगला पर्याय मिळाला आहे. सातारकरांनी नेहमीच साथ दिली असून हा महोत्सव त्यांच्यासाठीच असल्याचे श्री. छ. सौ. दमयंतीराजे यांनी सांगितले.

डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, महिलांचे चांगले संघटन निर्माण करण्याचे काम ‘नक्षत्र महोत्सवा’ने केले आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी योग्य मार्गदर्शनाचे काम या महोत्वसावातून केले आहे.  ग्रामीण भागतील महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करुन दिलं आहे. सौ. स्मिता घोडके म्हणाल्या, श्री.छ. सौ. दमयंतीराजे यांनी ‘नक्षत्र महोत्सव’ या लावलेल्या छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून त्यामध्ये सातारकरांचा मोठा वाटा आहे. सातारकरांचं भरभरुन मिळालेलं प्रेम आणि स्टॉलधारकांचा विश्‍वास यातून ‘नक्षत्र’ने गरुडझेप घेतली आहे.  दरम्यान,  प्रदर्शन पाहण्यासाठी सातारकर महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होवू लागली आहे.