Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Satara › दांडक्याने ठोकू म्हणणार्‍या जांभळेंची उंची काय?

दांडक्याने ठोकू म्हणणार्‍या जांभळेंची उंची काय? खा. उदयनराजे

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:27AMसातारा  : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता असतानाही कुठल्या नगरसेवकावर अन्याय केला नाही. मात्र, प्रत्येक मीटिंगला सर्व नगरसेवकांनी हजर असलेच पाहिजे. प्रशासनाने कुठल्याही नगरसेवकाचे चोचले पुरवू नयेत. प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ‘लँडमार्क’ प्रकल्प सुरू आहेत. दांडक्याने मारहाणीची भाषा मुख्याधिकार्‍यांना करणार्‍या धनंजय जांभळेची उंची काय? दादागिरी करायला अक्‍कल लागते का?  अशा शब्दांत खा. उदयनराजे भोसले पालिकेत गरजले. त्यांनी जांभळेंविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीईओंना केल्या.

सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी झाली. या सभेत भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी मुख्याधिकार्‍यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरपालिकेतील कर्मचारी तसेच अधिकार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले. सर्व कर्मचार्‍यांनी विभागातील कामकाज बंद केले. आणि सभागृहात एकत्रित आले. सभागृहात येऊन सातारा विकास आघाडीने आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच विरोधकांच्या या भूमिकेचा निषेध केला. नगरपालिकेत घडलेला सर्व वृत्‍तांत खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांना समजला आणि ते तासाभरातच नगरपालिकेत आले. सभागृहात घडलेली हकिकत त्यांना पदाधिकार्‍यांनी सांगितली.

कर्मचार्‍यांशी बोलताना ते म्हणाले,  तिर्‍हाईत नगरसेवक किंवा कुणीही असेल मी कधीही कुणाची बाजू घेऊन बोललो नाही. सर्वांची सांगड जोपर्यंत जुळणार नाही तोपर्यंत विकासकामे  सुरळीत सुरु होणार नाहीत. वेडावाकडा वागला म्हणून माझ्या एका मित्रावर अविश्‍वास ठराव आणून बाजूला त्याला केला. प्रोसेडिंग चेक केले तर बर्‍याच बाबी दिसून येतील. तुमच्यामध्ये काय इगो प्रॉब्लेम आहे हेच मला समजत नाही. आता पहिलं आणि शेवटचंच सांगतोय. प्रत्येक मिटिंगला सर्व नगरसेवक हजर असलेच पाहिजेत. प्रत्येकाने सहकार्‍यांना सपोर्ट केला पाहिजे.

चुका कुणाकडूनही होतात. शहरात राबवण्यात येत असलेल्या स्कीम चांगल्या आहेत. त्यासाठी निधी आणला आहे. सर्व निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. निधीविना प्रकल्प रखडू नयेत, याची काळजी मी घेत आहे. सातार्‍यातील सर्व प्रकल्प भविष्य काळात ‘लँडमार्क’ असतील. सातारा पालिकेत प्रशासनाकडून कुठल्याही नगरसेवकाचे चोचले पुरवेल जाता कामा नयेत. मुख्याधिकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांची जाण ठेवा. लहान मुले परवडली, असे सांगायची वेळ आली आहे. माझी राजकीय सुरुवात याच सभागृहात झाली. पण कधीही कुणी अर्वाच्च भाषा वापरली नाही.  ते म्हणाले, आपलीही गुणी बाळे आहेत. पण असे प्रकार सभागृहात चालत असतील तर नागरिक काय विचार करत असतील? माझी गाडीत येताना चर्चा झाली. आता मुख्याधिकार्‍यांना ही भाषा वापरली जात असेल तर उद्या कुणावरही अशी वेळ येऊ शकते.

आज सीईओंना बोलले आहेत उद्या कर्मचार्‍यांनाही बोलतील. पण हे दांडके कोणाकडे आहे? दांडके कुणाडेही असू द्या, मी आहे तोपर्यंत घाबरायचे कारण नाही. मी जिवंत असेपर्यंत तुमचे अधिकार अबाधित राहतील. मी  तुम्हाला न्याय देण्याचे काम करेन. मुख्याधिकार्‍यांनी जांभळेंविरोधात एफआयआर दाखल करावा. भीती वाटत असेल तर मी सोबत येतो. दादागिरी करायला अक्‍कल लागत का? धनंजय जांभळे यांचे रिव्हॉल्वर लायसन रद्द झाले पाहिजे.  उद्या कोणावरही गोळीबार होईल. माझी सहनशीलता संपली तर काय होईल  देवच जाणे, अशा शब्दांत खा. उदयनराजे यांनी इशारा दिला.