Fri, Jul 19, 2019 18:26होमपेज › Satara › सातार्‍यात 24 रोजी हेवीवेट मंत्री 

सातार्‍यात 24 रोजी हेवीवेट मंत्री 

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 11:41PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्यावतीने शहरात राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ करण्यासाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  दि. 24  फेब्रुवारी रोजी सातार्‍यात येत आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सौ. माधवी कदम म्हणाल्या,  दि. 24 रोजी खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारची जलदेवता असलेल्या कास तलावाची उंची वाढवणे, सातारकरांच्या कित्येक वर्षांचे स्वप्न असलेला पोवईनाक्यावर ग्रेड सेप्रेटरचे भूमिपूजन, सातार्‍याच्या सौंदर्यात व स्वच्छतेत भर टाकणारी भुयारी गटर योजना, सातार्‍याचा प्रशासकीय केंद्रबिंदू ठरेल अशी सातारा नगरपालिका नूतन विस्तारित अद्यावत इमारत या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  

त्यानंतर जि.प. मैदानावर सायंकाळी 5 वाजता  खा. उदयनराजे भोसले यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांसह यावेळी श्रीमंत शिवाजीराजे भोसले, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशु व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी फलोत्पादन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माढा मतदारसंघाचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, जि.प. पदाधिकारी, विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 

जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर म्हणाले, सर्वसामान्यांचे खा. उदयनराजेंवर प्रेम आहे. उदयनराजे मित्र समुहाने खा. उदयनराजेंकडे आग्रह धरल्यामुळे हा  कार्यक्रम घेण्याचे ठरले. खा. उदयनराजेंचा वाढदिवस आणि सातार्‍यातील महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम घेवून इतिहासात नोंद होईल, यासाठी मित्र समूह प्रयत्नशील आहे. कार्यक्रम संपल्यानंतर खा. उदयनराजे त्याच ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसल्याचेही काटकर यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, कास तलाव येथील भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री थेट त्याच ठिकाणी येणार असल्याने हॅलिपॅड  तयार करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी वाहनाने सातार्‍यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीसाठी जागा दिल्याबद्दल सातारा पालिका कल्याणी कुटुंबियांची आभारी आहे. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सभापती यशोधन नारकर, श्रीकांत आंबेकर,  सौ. गीतांजली कदम, सौ. रंजना रावत, मनोज शेंडे,  सौ. अनिता घोरपडे, नगरसेवक किशोर शिंदे, राजू भोसले,  ज्ञानेश्‍वर फरांदे, राजू गोडसे, संग्राम बर्गे, शिरीष चिटणीस, पंकज चव्हाण, बाळासाहेब गोसावी  आदी उपस्थित होते.