Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Satara › सातारा पालिकेत उद्या सभापती निवडी

सातारा पालिकेत उद्या सभापती निवडी

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 10:23PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेतील  सभापती, उपसभापती तसेच विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत दि. 8 रोजी संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी सभापती निवडींचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यांनी दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावली आहे.  दरम्यान, या सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची सत्‍ता आहे. मुदत संपत आल्याने यावेळी आपल्याला सभापतीपदासाठी संधी मिळावी यासाठी साविआतील अनेकांची इच्छा आहे. काहीजण तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आपल्याला मुदतवाढ मिळावी किंवा आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला सभापतीपद मिळावे यासाठी काहीजण आग्रही आहेत. मात्र, सभापती निवडीचा अधिकार साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. त्यामुळे ही नावे ऐनवेळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सभापती निवडीसाठी प्रांताधिकार्‍यांनी पिठासीन अधिकारी म्हणून सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांची नियुक्‍ती केली आहे. सभापती व सदस्य निवडीसाठी दाखल करण्यात येणारी नामनिर्देशनपत्रे मुख्याधिकारी शंकर गोरे स्वत:च्या दालनात स्वीकारणार आहेत. सातारा नगरपालिकेत  सार्वजनिक बांधकाम सभापती, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती, पाणीपुरवठा व जल:निस्सारण समिती सभापती,  शहर नियोजन व विकास समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांच्यासह या विषय समित्यांमधील प्रत्येकी 13 सदस्यांची  निवड करण्यात येणार आहे.  नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती तर सर्व सभापती हे सदस्य असतात.

त्यांच्याशिवाय 3  सदस्यांची या समितीवर निवड केली जाणार आहे. तर,  शिक्षण समितीचे उपनगराध्यक्ष हे पदसिध्द सभापती असल्याने याही समितीमधील 12 सदस्यांची यावेळी निवड  होणार आहे. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात होणार्‍या सभेत सभापतींची नावे जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापतीची अद्याप मुदत असल्याने या समितीचा निवडणूक कार्यक्रम कालांतराने होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

तपशील                                                                    वेळ

निवड प्रक्रियेबाबत माहिती देणे                                      11.15 वाजता
विषय समिती सदस्य नामनिर्देशनपत्र स्वीकारणे                 11.30 ते 12 वाजता
नामनिर्देशपत्राची छाननी                                               12 वाजता
उमेदवारी अर्ज मागे घेणे                                               12.15 वाजता
स्थायी  व विषय समिती सदस्यांची                                   12.30 वाजता
माहिती देणे, आवश्यकतेनुसार मतदान
सभापतीपदांसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे                    12.45 ते 1.45 वाजता
नामनिर्देशनपत्राची छाननी                                             1.45 वाजता
सभापतीपदाचे नामनिर्देशनपत्र मागे घेणे                           2 वाजता
आवश्यकतेनुसार मतदान                                              2.15 वाजता
सभापती, उपसभापती सदस्य निवडी जाहीर करणे