Tue, Apr 23, 2019 01:58होमपेज › Satara › आरोग्य अधिकार्‍यांच्या निलंबनाला कोलदांडा

आरोग्य अधिकार्‍यांच्या निलंबनाला कोलदांडा

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:06AMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित ठेकेदाराला भाडे न घेताच कॉम्पॅक्टर वाहन उपलब्ध करुन दिल्याच्या कारणावरुन तत्कालीन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे तसेच राजेंद्र कायगुडे यांच्या निलंबनाचे आदेश मुख्याधिकार्‍यांनी दिले. मात्र, अद्याप दोघांवर कारवाई झालेली नाही. नगराध्यक्षांनी दिलेल्या आदेशालाही कोलदांडा घातल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणार का? असा सवाल केला जात आहे.

आरोग्य विभागातील स्वच्छतेचे नव्याने ठेके काढण्यात आले. घंटागाडी तसेच शहरातील कचरा उचलण्याचे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आले. कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाने ठेकेदाराला कॉम्पॅक्टर भाड्याने दिला. संबंधित ठेकेदाराने डिझेल तसेच चालकावर झालेला खर्च पालिकेकडे जमा केला. मात्र, वाहन भाडे जमा केले नाही. याबाबत आरोग्य विभागाकडे पदाधिकार्‍यांनी विचारणा केली. मात्र,   समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. वाहन विभाग तसेच आरोग्य विभागातील सावळागोंधळ नुकत्याच झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत चव्हाट्यावर आला. यावेळी खुलासा करण्यासाठी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे तसेच तत्कालीन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे उपस्थित नव्हते. नगरसेवक वसंत लेवे यांनी कायगुडे यांना निलंबित करण्याची मागणी करत साखरे रजेवर असल्याचे सांगितले. साखरे न सांगताच रजेवर गेले असून त्यांचा रजेचा अर्ज नसल्याचे सांगत आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी साखरेंच्या निलंबनाची मागणी नगराध्यक्षांकडे केली. नगराध्यक्षांनी त्याचवेळी मुख्याधिकार्‍यांना  तसे आदेश दिले. 

या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला. सभागृहात अधिकार्‍यांवर कावाईची मागणी होते. नागरिकांसमोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले जाते. मात्र, सभा झाल्यानंतर केलेल्या मागण्यांचा विसर  पडतो. साखरे आणि कायगुडे यांच्यावर कारवाई होवू नये, यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे का? याची चर्चा आता सुरु झाली आहे.