होमपेज › Satara › सातारा पालिकेची आज ‘हायव्होल्टेज’ सभा

सातारा पालिकेची आज ‘हायव्होल्टेज’ सभा

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 20 2018 11:49PMसातारा : प्रतिनिधी

सत्‍ताधारी सातारा विकास आघाडीकडून विषय मंजुरीसाठी घेतले जात नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सातारा नगरपालिकेची विशेष सभा दि. 21 रोजी बोलवली आहे. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी दिवसभर ‘गृहपाठ’ केला. त्यांनी सभेदिवशी सकाळी  नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. सातारा विकास आघाडीने सस्पेस ठेवला असून सभागृहात काय होणार? याची उत्सुकता ताणली आहे.  आघाड्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभा ‘हायव्होल्टेज’ होणार आहे. स्थायी सभेत विषय मंजूर झाल्याने भाजप बघ्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे. 

सातारा नगरपालिकेत सत्‍ताधारी आणि विरोधकांचा वाद टिपेला पोहोचला आहे. सातारा विकास आघाडी तसेच नगर विकास आघाडीचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. आ. शिवेंद्रराजे भोसले  यांच्या तक्रारीनंतर आणि आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिल्यावर प्रशासन हलले. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा पालिकेची विशेष सभा दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात बोलावली आहे.  सभेचे कामकाज सातार्‍याच्या प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख पाहणार आहेत. आघाड्यांमधील संघर्ष विकोपाला गेल्याने नगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. ही सभा शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने पोलिस बंदोबस्त घेतला असून सभेच्या कामकाजाचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे.

 या सभेसमोर प्रभाग क्र. 19 मधील रामाचा गोट येथील सि.स.नं. 269 मधील नगरपालिका मालकीच्या जागेत बहुद्देशीय हॉल, व्यायामशाळा बांधण्याचा प्रस्ताव विहित नमुन्यात जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांकडे प्रशासकीय व वित्‍तीय मंजुरीसाठी व निधी मिळण्यासाठी सादर करण्यासाठी निर्णय घेणे, प्रभाग क्र. 19 मधील मंगळवार पेठेतील सि.स.नं. 456 मध्ये काँक्रेट पायर्‍या करण्याच्या अंदाजपत्रकीय रक्‍कम 8 लाख 35 हजार 460 रुपयांच्या खर्चास व कामास मंजुरी देण्याबाबत निर्णय घेणे, सातारा शहरातील विविध विकासकामांचा जिल्हा नियोजन विकास आराखडा 2019-2019 मध्ये समावेश करण्यात येणार्‍या खर्चास व कामास मंजुरी देण्याबाबत निर्णय घेणे, असे विषय चर्चेसाठी घेण्यात आले आहेत. 

या सभेची संपूर्ण सातारा शहरात चर्चा झाल्याने सभेचे कामकाज पाहण्यासाठी नागरिकांची सभेवेळी गर्दी होणार आहे.  सभेचे स्वरुप आणि अध्यक्ष बदलला तरी कामकाजाची प्रक्रिया तीच राहणार असल्याने साविआने वेगळ्यापध्दतीने मोर्चेबांधणी केली आहे. विशेष सभेची नामुष्की ओढवल्याने सातारकरांमध्ये आणखी वेगळा मेसेज जावू नये यासाठी साविआने सावध पवित्रा घेतला असून भूमिकेबाबत सस्पेंस ठेवला आहे. त्यामुळे साविआ सभेवर बहिष्कार घालणार का, सभेमध्ये मतदान घेवून विरोधकांचे विषय तहकूब करणार का, कोरम पूर्ण करणार का, याची उत्सुकता लागली आहे. साविआने सभेच्यादृष्टीने स्ट्रॅटेजी आखली आहे. 

साविआचे नेते खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर नगरसेवकांसोबत  झालेल्या बैठकीत सभेवेळी कुणी काय करायचे याच्या सूचना पदाधिकार्‍यांना देण्यात आल्याची आघाडीत चर्चा आहे. साविआ नगरसेवक सभेला उपस्थित राहणार हे नक्‍की आहे. मात्र, विषय मंजूर केले जाणार की नाही, याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे.  गुरुवारी सकाळी नगराध्यक्षांच्या दालनात पदाधिकारी,  नगरसेवकांची बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा विकास आराखड्यातून  नविआचे साधारण 15 विषय चर्चेसाठी घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी परिपूर्ण असलेले 10 विषय मंजूर केले जातील, अशी नविआला आशा असली तरी  3-4 विषय मंजूर करुन उर्वरित विषयांमध्ये त्रुटी दाखवून ते तहकूब केले जाण्याची दाट शक्यता आहे. नविआची तांत्रिक मुद्यांवर गोची  करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सभेत ऐनवेळच्या विषयांवर चर्चा करण्यास मनाई असल्याने विषयपत्रिकेवरील विषयांवरच नविआकडून साविआ टीकेचे लक्ष  होण्याची शक्यता आहे. या सभेचे कामकाज प्रशासनाच्यावतीने चालवले जात असल्याने कायदेशीर बाजूंचा आधार घेवून नविआकडून विकासकामांवर चर्चा घडवली जाणार आहे. त्यादृष्टीने नविआचे काही नगरसेवक बुधवारी दिवसभर नगरपालिकेत तळ ठोकून होते. विशेष सभेच्या अनुषंगाने त्यांनी चांगलाच ‘गृहपाठ’ केला. विषयपत्रिकेवरील विषयांना दिलेल्या सूचना त्यांनी पडताळून पाहिल्या. विषयांमधील त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते. नविआने गुरुवारी सकाळी 10 वाजता विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात बैठक बोलवली आहे.  

दरम्यान, भाजप नगरसेवकांचे विषय बर्‍यापैकी स्थायी सभेत मंजूर झाले. त्यामुळे भाजपच्या विरोधाची धार कमी झाली आहे. मात्र, गटनेत्यांच्या विकासकामांची फाईल गायब झाल्याने त्यांच्याकडून हंगामा होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. अपवाद वगळता भाजपचे नगरसेवक बघ्याची भूमिका घेण्याचीच जास्त शक्यता आहे. मतदानाबरोबरच सभेच्या कामाजात ते सक्रिय सहभाग घेणार नसल्याचे बोलले जात आहे. विशेष सभेत काय घडणार, याची उत्सुकता सातारकरांमध्ये निर्माण झाली आहे.