Thu, Apr 18, 2019 16:10होमपेज › Satara › गर्भपातासाठी ‘सायनोकेम’च्या गोळ्या

गर्भपातासाठी ‘सायनोकेम’च्या गोळ्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील काही डॉक्टर तसेच मेडिकल्सकडून मेडिकल टर्मिनल ऑफ प्रेगन्सी (एमटीपी) किटचा बेकायदेशीरपणे सर्रास वापर केला जात आहे. कोंडवे, ता. सातारा येथील कारवाईत अन्न व औषध प्रशासनाला सापडलेल्या गोळ्या  उत्‍तराखंडमधील सायनोकेम प्रा. लि. कंपनीच्या असल्याचे उघड झाले. या गोळ्यांची खातरजमा करण्यासाठी कंपनी अधिकार्‍याला पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जावून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गर्भपाताच्या गोळ्यांचा वापर करून, स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. तसेच अनावश्यक असलेला गर्भ काढून टाकण्यासाठीही गर्भपात गोळ्या वापरल्या जात आहेत. चार वर्षांपूर्वी राज्यात अशा औषधांच्या खरेदी-विक्रीची तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हाती घेतली होती. या मोहिमेपूर्वी पुणे विभागात गर्भपात गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती.  मोहिमेच्या प्रारंभी अशा  गोळ्याच्या विक्रीला काही प्रमाणात पायबंद बसला. त्यानंतर मात्र या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा ‘जैसे-थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. गर्भपात गोळ्यांची विक्री करणारे मोठे रॅकेट सातारा जिल्ह्यात कार्यरत असून काही डिस्टीब्युटर्सचे लागेबांधे त्यांच्याशी असलेल्याची माहिती मिळत आहे. 

कोणत्याही कंपनीने मार्केटमध्ये नव्याने आणलेले औषध बाजारपेठेत खपवण्यासाठी स्वतंत्र अशी खास यंत्रणा असते. कंपनी व तिचे विभागवार नेमलेले सीएनएफ एजंट आणि त्यानंतर जिल्हास्तरावर वितरकांकडून (डिस्ट्रीब्युटर) रिटेलर असलेल्या मेडिकल्सना औषधे पुरवली जातात.  ब्रँडेड कंपन्यांची अशी स्वतंत्र चेन असली तरी  तशीच यंत्रणा बनावट औषध बाजारात आणणारीही यंत्रणा कार्यरत आहे.  बर्‍याचदा आघाडीच्या कंपनीचे ब्रँड नेम वापरले जाते. सातारा तालुक्यातील कोंडवेेत सुमारे 50 हजार  हजारांची 18 एमटीपी किट सापडली.

 कारवाईत सापडलेल्या गर्भपातावरील गोळ्या उत्‍तराखंडमध्ये असलेल्या सायनोकेम प्रा. लि. कंपनीच्या नावाने बाजारात आणल्या गेल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयाशी संपर्क साधला असून या गोळ्या खरोखरच त्या कंपनीच्या आहेत का? याची चौकशी करण्यासाठी कंपनीच्या अधिकार्‍याला बोलावले आहे. पुढील आठवड्यात गोळ्यांची विविध कसोट्यांवर सत्यता पडताळली जाणार आहे.  कारवाईत जप्‍त केलेल्या गर्भपात गोळ्यांच्या पाकिटावरील बॅच, गोळ्यांचे नमुने घेवून इतर बाबींची चौकशी केल्यावरच नेमका प्रकार समोर येणार आहे. 
जिल्ह्यातील काही डॉक्टर अशा बनावट गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदेशीर वापर करत असून अशा गोळ्या काही मेडिकल्सवालेही पुरवत असल्याचीही माहिती मिळत आहे.

जिल्ह्यात 2200 मेडिकल्स असून पाच-सहा होलसेलर आहेत.  जिल्ह्यातील खूप थोड्या मेडिकल्सला एमटीपी किट विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीही काही मेडिकल्सवाल्यांनी बेकायदेशीरपणे एमटीपी किट खरेदी-विक्रीचा धंदा मांडला आहे. त्यातून महिन्याला लाखोंची उलाढाल होत आहे.  मेडिकल्सनी खरेदी-विक्री केलेल्या गर्भपात गोळ्यांचा हिशेब घेतल्यास रॅकेटमधील बरेचजण हाती लागतील. पण यातून डॉक्टर्स सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
 

 

 

tags ; Satara,news,Medical, terminal, Pregnancy, Illegal, use, of kit,


  •