Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Satara › मार्च एंडिंगमुळे सुट्टीदिवशीही लगबग

मार्च एंडिंगमुळे सुट्टीदिवशीही लगबग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गुरूवारपासून सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. मात्र, मार्च एंडिंगमुळे सर्व शासकीय व खासगी बँका, विविध शासकीय कार्यालये व संस्था सुट्टीच्या दिवशीही सुरु होत्या. आर्थिक वर्षाचा ताळेबंद करण्यासाठी कर्मचार्‍यांची लगीनघाई सुरू होती.  यावर्षी मार्च एंडचे शेवटचे तीन दिवस महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि शेवटचा शनिवार क्‍लोजिंग डेट असल्याने यादिवशी कोणतेही व्यवहार होत नाहीत. हे तीन दिवस सुट्टीचे आणि 1 एप्रिलला रविवार आला असल्याने सलग चार दिवस सुट्टया आहेत. मात्र, मार्च एंडिंगच्या कामांचा निपटारा करण्यासाठी कर्मचारी वर्गाला सुट्टी दिवशीही कार्यालयात उपस्थित   राहून  कामकाज करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

नोटाबंदीबरोबरच यावर्षी जीएसटी लागू केल्यामुळे बहुतेक संस्थांची 31 मार्चला कसरत होणार आहे. सर्वत्र आर्थिक वर्षाचा ताळेबंद पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे ऑफिस टाईम ड्यूटी असणारा नोकर वर्गही राउंड अ क्‍लॉक  काम करताना दिसत आहे. सध्या बँका, वित्त संस्था तसेच खाजगी व शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एंडची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक संस्थांनी वसुली मोहिमेचा धडाका लावल्यामुळे हबकलेल्या थकबाकीदारांनी रांगेत उभे राहून हप्ते भरले असले तरी कार्यालयीन कामकाज अजूनही बाकी आहे.

त्यामुळेच संबंधित कार्यालयातील कर्मचारी  फायली पूर्ण  करण्याच्या कामात  गुंतलेले  दिसत आहेत. गुरुवार, शुक्रवार , शनिवार आणि रविवार अशी सलग चार दिवस सुट्टी येत असल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार बंद असले तरी संस्थांच्या आर्थिक ताळेबंदासाठी महिना अखेरच्या कामांचा निपटारा करण्यासाठी कार्यालयीन कामे सुरुच राहणार आहेत.
बँका व शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीही मार्च एंडिंग बघून सुट्ट्या न घेण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे कर्मचारी बँकेत हजर राहत आहेत. सुट्टीमुळे ग्राहक जरी बँकेत नसले तरी कर्मचारी काम करताना दिसत आहेत. नेहमीपेक्षा जास्त वेळ हे काम सुरू असल्याचे दिसत आहे. 

कर्जदारांचे मोबाईल ‘स्वीच ऑफ’

सध्या मार्च एंडिंगसाठी अवघे तीन दिवस उरले असताना अनेक जणांनी वसुलीच्या धसक्याने  आपले मोबाईल स्वीच ऑफ ठेवल्याने ते आऊट ऑफ कव्हरेज लागत असल्यामुळे वसुली अधिकारी व संबंधित संस्थांची पंचाईत होत आहे. मात्र, अनेक संस्थांनी कर्ज रखडवलेल्यांवर कारवाईचा बडगा सुरू केला आहे.   सध्या बँका, पतसंस्था, सहकारी संस्था, सोसायट्या यांच्याकडून ज्या ज्या ग्राहकांनी कर्जे रखडवली आहेत त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

त्यांच्याकडून कर्जवसुलीचा धडाका सुरू केला आहे. यासाठी शहरी भागाबरोबरच ही मोहीम ग्रामीण भागात तीव्रगतीने सुरू केली आहे. यामध्ये 101 व 131 कलमान्वये कारवाई सुरू केली आहे. काही ठिकाणी बँका व पतसंस्थांची वसुली बर्‍यापैकी होत आहे तर अनेक ठिकाणी  सोसायट्या, पतसंस्था, बँकाच्या वसुली अधिकार्‍यांना कर्जवसुलीसाठी  मोठ्या थकीत ग्राहकांचा पाठपुरावा करावा लागत आहे. त्यासाठी दिवसभर पाळत ठेवून अशा कर्जदारांना हुडकून हे सर्व सोपस्कार करावे लागत आहेत. पण अनेक महाभाग वसुलीच्या धसक्याने गायब झाले आहेत. त्यांनी 

मोबाईल स्वीच ऑफ केले आहेत. यामध्ये प्रामाणिक कर्जदार मात्र आपली कर्जबाकी भरून मोकळा झाला आहे. त्यातच  भाजीपाला, कांदा व अन्य अन्न धान्याचे बाजारपेठेत दर पडल्याने शेतकर्‍यास पीक उत्पादनातून काहीही न  मिळाल्याने अनेक जण अडचणीत आले आहेत. त्यामुळे  व्यापारी वर्ग ही अडचणीत आला आहे. याचा परिणाम बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवू लागला आहे.
 


  •