Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Satara › सातार्‍यात मराठा आंदोलन पेटले 

सातार्‍यात मराठा आंदोलन पेटले 

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 11:13PMसातारा : प्रतिनिधी

राजधानीत सातार्‍यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने झाल्यानंतर दुपारी मात्र आंदोलनाला काही समाजकंटकांनी गालबोट लावले. राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटादरम्यान महामार्ग रोको सुरू असताना पोलिस व मराठा क्रांती मोर्चाची समन्वय समिती जमाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानकपणे तुफान दगडफेक झाली. त्यात जमाव हिंसक झाला. जाळपोळीसह तब्बल 3 तास महामार्गावर झालेल्या धुमश्‍चक्रीमध्ये पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या. या धुमश्‍चक्रीत जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांच्यासह 15 पोलिस व मराठा क्रांती समन्वय समितीचे पदाधिकारी व पत्रकार जखमी झाले.

संतप्‍त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी वीसहून अधिक अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून  लाठीचार्जही केला.  धुमश्‍चक्रीप्रकरणी सुमारे 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी पालकमंत्री,  विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकार्‍यांनीही भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मराठा आंदोलनामध्ये समाजकंटकांनी घुसून गैरप्रकार केले असल्याची शक्यता असून पोलिसांनी  त्याद‍ृष्टीने तपास सुरू केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सातार्‍यात ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनासह बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार  सकाळी मराठा समाज बांधवांनी ऐतिहासिक  गांधी मैदानावरून विराट महामोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्याचबरोबर शहर व परिसरात कडकडीत बंदही पाळण्यात आला. दुपारी मात्र  महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट येथे नजिकच्या ब्रिजवर महामार्ग रोको केल्याचे वृत्त पसरले.  पाहता पाहता तेथील परिस्थिती चिघळत गेली. हा प्रकार जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांना समजला.

त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीला बरोबर घेतले आणि तडक महामार्ग गाठला.  संदीप पाटील व मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती महामार्गावर आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानकपणे ब्रिजच्या खालून सलग दगडफेकीला सुरूवात झाली आणि सगळा जमाव सैरावैरा पळू लागला. एखाद्या थरारक चित्रपटात द‍ृष्य दिसावे तसे धडाधड दगड खालून वर महामार्गाच्या दिशेने भिरकावले जात होते. या दगडफेकीत जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी व मोर्चा कव्हर करण्यासाठी आलेले पत्रकारही जखमी झाले. दगडफेकीच्या प्रकारामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे घटनास्थळी पोलिस विरूद्ध आंदोलक विरूद्ध काही समाजकंटक अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात वाहनांची तोडफोडही झाली. यावेळी महामार्गावर आंदोलकांची गर्दी वाढतच गेली.  पोलिस व आंदोलकांमध्ये तू तू मै मै झाली. अचानक दगड व बाटल्या पडू लागल्याचा आवाज येवू लागला. 

यावेळी मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकार्‍यांनीही आंदोलकांना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पोलिस व  मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना जमाव काही केल्या ऐकत नव्हता. चिडलेल्या जमावाने पोलिस अधीक्षकांच्या गाडीला लक्ष्य करत त्यावर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या.  जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने अखेर मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर पोलिसांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली. 

यावेळी जमावाने परिसरातील दुकान, शोरुमवर दगडफेक करत  वाहनचालकांनाही टार्गेट करण्यास सुरुवात झाली.  जमाव घोषणाबाजी करत असतानाच टायर पेटवून जाळपोळ करण्यात आली. शिवराज पेट्रोलपंप, वाढे फाटा व बॉम्बे रेस्टॉरंट येथे जात आंदोलकांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला.  त्यामुळे पोलिसांची फौज बॉम्बे रेस्टॉरंट पुलाच्या खाली असतानाच जमावाला अनेक रस्ते फुटू लागले. पहिला हल्‍ला कणसे होंडा शोरुम समोर झाल्याने कराडच्या बाजूने पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांची टीम तैनात झाली. याचवेळी नटराज मंदीरजवळही आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले होते. यामुळे या जमावाला थोपवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाची टीम तैनात करण्यात आली. दोन्ही बाजूला आंदोलक हिंस्त्र कृत्य करत असतानाच विसावा नाक्याजवळ तिसरा जमाव जमल्याने त्याला थोपवण्यासाठी पोनि नारायण सारंगकर यांच्या टीमने कंबर कसली. या तिन्ही टीम तिन्ही बाजूला आठ ते दहा पोलिसांच्या मदतीने जमावाला शांततेचे आव्हान करत असताना बॉम्ब रेस्टॉरंट पुलाखाली अतिरीक्‍त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार व पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, अजित टिके यांची टीम उर्वरीत तिन्ही पथकांना मदत करत होती. एकीकडे जमावाची तोडफोड व पोलिसांवर सलग दगडफेक होत असल्याने पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडण्यास सुरुवात केली.

एकापाठोपाठ अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल अशी पोलिसांची अपेक्षा होती. मात्र पोलिसांचा प्रतिकार अपुरा पडू लागल्याने जमाव पोलिसाला आणखी डिवचू लागला. दुपारी एक वाजल्यापासून कणसे शोरुम समोर, कोरेगाव रोडवरील नटराज मंदीर व विसावा नाक्याकडील दिशेने सतत दगडफेक होत होती व पोलिस त्याला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रतित्युत्तर देत होती. पोलिस जमावाला मागे रेटण्याचा प्रयत्न करत असताना जमाव अडचणींच्या बाजूला जावून पुन्हा मुख्य महामार्गावर येत होता. पोलिस व आंदोलक यांच्यामध्ये हा तब्बल तीन तास लंपडांव सुरु होता. या तीन तासात बॉम्ब रेस्टॉरंट परिसरातील दुकाने, शोरुम, काचेच्या इमारती, ट्रक, दुचाकी टार्गेट झाल्याने तिन्ही बाजूच्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावर दगड, काचा, बाटल्या, झाडी, पत्रा, फरशा, वीटा यांचा खच पडलेला होता.

दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेल्या हिंसक आंदोलन अखेर पोलिसांनी तीन वाजेपर्यंत मोडीत काढले.  पोलिस दल व समन्वय समितीचे पदाधिकारी एकत्रितपणे सातारा शहरात शांततेचे आवाहन करत फिरले.  तिन्ही बाजूला येणार्‍या जमावाच्या दिशेने पोलिसांच्या तिन्ही टीमने पाठीमागे पाठीमागे रेटत मुख्य रस्ते मोकळे केले. याच कालावधीत सुमारे 50 हून अधिक आंदोलकांना पकडण्यात आले.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पालकमंत्री ना.विजय शिवतारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलिस दलाला सूचना दिल्या. सुरळीत सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्यासाठी नेमकी दगडफेक कोणी केली? यादिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.