Thu, Jul 18, 2019 02:19होमपेज › Satara › जिल्ह्यात ‘हर हर महादेव’चा गजर

जिल्ह्यात ‘हर हर महादेव’चा गजर

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

‘हर हर महादेव, शिव शंभो, ॐ नमः शिवाय’च्या गजरात जिल्ह्यात विविध ठिकाणच्या शंभू महादेवाच्या मंदिरांत महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत दर्शनासाठी पहाटेपासूनच शिवभक्‍तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अत्यंत दुर्गम अशा वासोटा किल्ला व कांदाटी खोर्‍यातील  पर्वतच्या  शिवमंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत महारूद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. त्यामुळे  पहाटेपासूनच 

भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणच्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्‍त झाले होते. काही ठिकाणी मंदिर परिसरांमध्ये प्रसाद, पूजा साहित्य  व खेळण्यांच्या दुकानामुळे यात्रेचे स्वरुप आले होते. शंभू महादेवाच्या विविध ठिकठिकाणच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. दुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या पर्वत तर्फ वाघावळे येथील श्री क्षेत्र जोम मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीमुळे उत्सवाचे स्वरुप आले होते. डोंगरी भागातील तमाम भाविकांचे हे श्रद्धास्थान असून येथे भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्याचबरोबर वासोटा किल्ल्यावरील नागेश्‍वर मंदिरातही तोबा गर्दी झाली होती. भाविक बोटीतून देवदर्शनासाठी येत होते. 

सातारा शहरातील कोटेश्‍वर मंदिर, संगम माहूली येथील  काशीविश्‍वेश्‍वर मंदिर, नटराज मंदिरातील मूलनाथेश्‍वर, लिंब गोवे येथील कोटेश्‍वर, देगाव येथील पाटेश्‍वर, क्षेत्र महाबळेश्‍वर, शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर, यवतेश्‍वर, सिध्देश्‍वर कुरोली येथील सिध्देश्‍वर मंदिर, कोेरेगाव येथील केदारेश्‍वर , तांदुळवाडी येथील कोल्हेश्‍वर, गुरसाळे येथील भावलिंग देवस्थान, वाई येथील मेणवलेश्‍वर व अमृतेश्‍वर मंदिर, आगाशिवनगर येथील डोंगरावरील शंकर मंदिर, किसनवीर कारखाना येथील चंद्र मौलेश्‍वर, साप येथील महादेव मंदिर, ब्रम्हपुरी यासह विविध शंभू महादेवाच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. 

यवतेश्‍वर येथील मंदिरात अभिषेक, महाआरती, देवाचा छबिना  आदी कार्यक्रम झाले. तसेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.  शहरातील नटराज मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त बर्फाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील विविध आगारामार्फत भाविकांच्या सोयीसाठी लिंब गोवे, यवतेश्‍वर, शिखर शिंगणापूर, क्षेत्र महाबळेश्‍वर या ठिकाणी जादा एसटी  बसेस सोडण्यात येत होत्या. जिल्हा  पोलिस दलाच्यावतीने ठिकठिकाणच्या मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसला.