Tue, Jul 23, 2019 07:24होमपेज › Satara › सातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव 

सातारा लोकसभा शिवसेना लढवणारच : चंद्रकांत जाधव 

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:07AMसातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभेची जागा शिवसेना सोडणार नसून याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची  सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे शिष्टमंडळ  लवकरच भेट घेऊन याबाबत मागणी करणार आहे. ही जागा शिवसेनाच जिंकणार असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख  व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.

1996 साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  प्रतापराव भोसले व विद्यमान खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्याचा इतिहास हा शिवसेनेच्या नावावर आहे. त्यावेळचे सेनेचे उमेदवार  हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी या बलाढ्य दोन्ही उमेदवारांचा पराभव करून  शिवसेनेने सातारा लोकसभेच्या या जागेवर कब्जा केला होता. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रात पहिले आमदार निवडून देण्याचा बहुमानही सातारा  लोकसभा मतदारसंघातील जावली तालुक्याला मिळाला होता.

विद्यमान खासदारांना पराभूत करण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेतच आहे. म्हणून सर्व शिवसैनिकांमध्ये सातारा लोकसभेसाठी उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. ही जागा जिंकून शिवसेना पुन्हा इतिहास निर्माण करणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे शिष्टमंडळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेवून कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेच लढवावी अशा प्रकारचा आग्रह धरणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात अडीच लाख  मतदारांची वोट बँक ही कायम शिवसेनेची आहे. तसेच मतदारसंघातही गावोगावी दौरे सुरू असून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी जोरदार सुरू आहे. त्यामुळे गावोगावी शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना एकत्र करण्यात यश मिळत आहे, असेही चंद्रकांत जाधव यांनी म्हटले आहे. 

कोर्‍या पाटीचा व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक हे शिवधनुष्य पेलून ही जागा राज्यात जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. युती होवो अथवा ना होवो  सातारा लोकसभेची जागा शिवसेनाच ताकदीने लढवणार असल्याचा  विश्‍वास  चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.

Tags : Satara,Lok Sabha, Shiv Sena,  Chandrakant Jadhav