Fri, May 29, 2020 19:50होमपेज › Satara › उदयनराजेंनी राखला बालेकिल्‍ला

उदयनराजेंनी राखला बालेकिल्‍ला

Published On: May 27 2019 1:37AM | Last Updated: May 26 2019 8:04PM
हरीष पाटणे
 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून उदयनराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघातून तिसर्‍यांदा तिकीट देण्याला विरोध करणार्‍यांचा विरोध डावलून उदयनराजेंनाच पुन्हा संधी देण्याची राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांची रणनीती अचूक असल्याचे सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले आहे. माढ्यासह लगतचे राष्ट्रवादीचे किल्‍ले ढासळले असताना, राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्‍ला सुरक्षित राहिला आहे.  

सातार्‍याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये बेबनाव होता. उदयनराजेंच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले; मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली होती. उदयनराजे भाजपच्या कळपात जाऊ नयेत म्हणून शरद पवार आमदारांच्या गैरहजेरीत उदयनराजेंच्या वाढदिवस सोहळ्याला जातीने हजर होते. लोकसभा निवडणुकीपर्यंत पवारांनी सबुरीने घेत पॅचअपचे प्रयत्न केले. मात्र, उदयनराजेंच्या उमेदवारीला आमदारांनी व पदाधिकार्‍यांनी लाल झेंडा दाखवून विरोध केला. त्यानंतर मात्र पवारांनी प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणे चर्चेला बोलावून खरी ‘मेख’ सांगितली. आमदार, पदाधिकार्‍यांचा विरोध डावलून सातारा लोकसभा मतदारसंघातून तिसर्‍यांदा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उदयनराजेंनाच पवारांनी उमेदवारी दिली. एवढेच नाही, तर आपल्या आमदारांना उदयनराजेंना मताधिक्य देण्याचे आदेश दिले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीचे वातावरण अचानक बदलले आणि उदयनराजेंच्या प्रचारात राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षनिष्ठेने सामील झाले. 

उदयनराजेंविरोधात शिवसेनेने भाजपकडून आयात केलेले नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. नरेंद्र पाटील हे माथाडी नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आणि नंतर उद्धव ठाकरे यांनीही आपलेसे केलेले. त्यामुळे उदयनराजेंच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक अटीतटीची होणार, असे वातावरण आपसूक तयार झाले. राष्ट्रवादी  पक्षाच्या आमदारांनी दिलेली प्रामाणिक साथ, राष्ट्रवादीचे गावोगावी असलेले मोठे केडर, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजेंबद्दल असलेली सातारा जिल्हावासीयांची आस्था, सातारा लोकसभा मतदारसंघात वाढलेले चार टक्के मतदान, सुुमारे लाखभर वाढलेले नवमतदार या सर्व बाबी उदयनराजे यांच्या पथ्यावर पडल्या. याउलट शिवसेनेचे उमेदवार असूनही भाजप आणि सेनेच्या पदाधि-कार्‍यांमध्ये एकसुरीपणा आणण्यात आलेले अपयश, निवडणूक लढवण्याचा नसलेला अनुभव, गावोगावीच्या बूथपर्यंत नसलेला संपर्क या बाबी नरेंद्र पाटील यांच्यासाठी तोट्याच्या ठरल्या. त्यामुळे उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 अशी मते मिळाली. उदयनराजे तब्बल 1 लाख  26 हजार 528 मतांनी निवडून आले. वाई विधानसभा मतदारसंघात त्यांना आ. मकरंद पाटील यांच्या सहकार्याने 32 हजार 212, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे 33 हजार 427, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आ. बाळासाहेब पाटील व धैर्यशील कदम यांच्या सहकार्याने 38 हजार 963, तर सातारा विधानसभा मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने 44 हजार 957 मतांची आघाडी मिळाली. कराड दक्षिण मतदारसंघात उदयनराजे 4 हजार 828, तर पाटण मतदारसंघात 18 हजार 314 मतांनी पिछाडीवर राहिले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रामाणिक साथ दिल्यामुळे, काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, विराज शिंदे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर यांनीही उदयनराजेंच्या विजयात वाटा उचलला. 

माढा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, पुणे, मावळ अशा सर्वच बाजूंनी युतीचे उमेदवार निवडून आल्याने पवारांच्या राष्ट्रवादीची हवा निघून गेली असताना उदयनराजेंमुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्‍ला सुरक्षित राहिला. त्यामुळेच हॅट्ट्रिक करून तिसर्‍यांदा संसदेत गेलेल्या उदयनराजेंमुळे राष्ट्रवादीचीही कॉलर टाईट झाली.

महायुतीची 4.52 लाख मते आघाडीसाठी धोक्याची 

उदयनराजे जरी 1 लाख 26 हजार 528 मतांनी निवडून आले असले तरी त्यांचे मताधिक्य गेल्यावेळेपेक्षा घटले आहे. शिवाय उदयनराजेंच्या विरोधात  महायुतीच्या नरेंद्र पाटील यांना मिळालेली 4 लाख 52 हजार 498 मते विचार करायला लावणारी आहेत. नरेंद्र पाटील यांनी अनुभव नसतानाही कमी कालावधीत दिलेली लढत, माथाडी कामगारांचे त्यांना मिळालेले पाठबळ, भाजपने त्यांच्यासाठी घेतलेली मेहनत याचेच हे यश आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात महायुतीने ही मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसाठी ही पोषक आकडेवारी आहे.

वंचितांना मिळाली 40 हजार मते 

वंचित आघाडीचे सहदेव ऐवळे यांना तब्बल 40 हजार 673 एवढी मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे सर्वच विधानसभा मतदारसंघांत त्यांचा आकडा 5 हजाराहून पुढे आहे. याचाच अर्थ वंचित आघाडीने आपला पाया भक्‍कम करण्यास सुरुवात केली आहे.