Fri, May 29, 2020 19:14होमपेज › Satara › उदयनराजे यांच्यासमोर कोण लढणार?

उदयनराजे यांच्यासमोर कोण लढणार?

Published On: Feb 16 2019 1:51AM | Last Updated: Feb 16 2019 1:51AM
हरीष पाटणे
 

संपूर्ण देशात गाजत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले हे हॅट्ट्रिक करणार का? त्यांच्यासमोर नेमका कोण उमेदवार लढणार? याविषयी संपूर्ण राज्यात कुतूहल आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी असलेले संबंध पाहता व केवळ संख्याबळ डोळ्यांसमोर ठेवून कोणतीही रिस्क घेऊ न पाहणारे पवार उदयनराजेंच्याच उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब करतील, असेच वातावरण सातार्‍यात आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध असला, तरी पवारांना पंतप्रधान करण्याची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पवारांच्या इच्छेखातर उदयनराजेंचे काम करावेच लागणार आहे. विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसले, तरी स्वकीयांच्या उपद्व्यापामुळे उदयनराजेंसाठी ही निवडणूक ‘राजा, रात्र वैर्‍याची आहे’, अशीच आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्‍ला राहिला आहे. 1952 पासून या मतदारसंघाचा धांडोळा घेतला, तर 1952 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्यंकटराव पवार, 1957 मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे क्रांतिसिंह नाना पाटील, 1962 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे किसन वीर आबा, 1967, 1971, 1977 असे तीन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे यशवंतराव चव्हाण, तर 1980 मध्ये काँग्रेस अर्स पक्षातर्फे पुन्हा यशवंतराव चव्हाण, 1984, 1989 व 1991 अशी सलग तीन टर्म भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रतापराव भोसले, 1996 मध्ये शिवसेनेतर्फे हिंदुराव ना. निंबाळकर, 1998 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अभयसिंहराजे भोसले, 1999, 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लक्ष्मणराव पाटील, 2009, 2014 अशी सलग 10 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघात जनतेने निवडून दिलेले उमेदवार ठरले आहेत.

राष्ट्रवादीचे सलग 10 वर्षे खासदार असलेले उदयनराजे शरद पवारांशिवाय कोणालाही मोजत नाहीत, ही त्यांच्याविषयीची राष्ट्रवादीच्या आमदारांची तक्रार राहिली आहे. दस्तुरखुद्द शरद पवारांपर्यंत आमदारांनी तक्रारी करून पाहिल्या. उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही आमदार मंडळी अनुपस्थित राहिली. पवारांपर्यंत पोहोचवायचा तो मेसेज आमदारांनी पोहोचवला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या वाढदिवस सोहळ्यात पवारांनी पाहिलेली गर्दी ते विसरले नसावेत. लोणंद येथील एका कंपनीच्या प्रकरणानंतर जामिनावर सुटलेल्या उदयनराजेंना भेटण्यासाठी सातार्‍यात झालेली तोबा गर्दी, मराठा क्रांती मोर्चावेळी संपूर्ण राज्याने पाहिलेला उदयनराजेंचा माहौल पवारांनी अनुभवला आहे. त्यामुळे फडणवीसांनी उदयनराजेंभोवती फेकलेले जे जाळे आहे, त्यात पवारच उदयनराजेंना अडकू देत नाहीत. पवारांना हक्‍काचा मोहरा दुसर्‍याच्या ताब्यात द्यायचा नाही. माढा मतदारसंघातून पवार स्वत: निवडणूक लढवायला निघाले आहेत. माढा हा सातार्‍यालगतचा मतदारसंघ येतो. या मतदारसंघात उदयनराजेंचाही थोडाफार करिश्मा चालतो. पवारांना स्वत:लाही कोणता धोका नको आहे. त्यामुळे झालीच तर त्यांना माढ्यात उदयनराजेंची मदत होणार आहे. त्यामुळेच पवार रिस्क घ्यायला तयार नाहीत. पक्ष सातारा जिल्ह्यात कुणा एकाच्या ताब्यात राहू नये, याची पुरेपूर काळजी पवारांनी घेतली आहे. त्यामुळेच काही आमदारांचा विरोध असला, तरी पवार उदयनराजेंची बाजू घेताना दिसत आहेत. शिवेंद्रराजेंचीही त्यांनी समजूत काढली आहे. उदयनराजे भाजपमध्ये गेले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांना महाराष्ट्रभर फिरवतील आणि भाजपला त्याचा फायदा होईल, ही अटकळ पवारांनी बांधली असल्याने ते उदयनराजेंना सोडायला तयार नाहीत. त्यामुळेच पवारांचा आदेश आल्यानंतर पंतप्रधानपदाचे गणित डोक्यात ठेवून संख्याबळाचा हिशेब मांडत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला उदयनराजेंचे काम करावे लागणार आहे. लोकसभेनंतर विधानसभा असल्याने आमदार मंडळींनाही धोका नको आहे. तरीही उदयनराजेंसाठी गेल्या दोन वेळेप्रमाणे सोपी वाटलेली निवडणूक अंतर्गत कलहांमुळे फंदफितुरींमुळे वाटते तेवढी सोपी नाही. 

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपकडे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माथाडींचे नेते व अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अशी नावे चर्चेत आहेत. मात्र, पुरुषोत्तम जाधव वगळता कुणीही खुलेपणाने उदयनराजेंविरोधात लढणारच, असे बोलत नाही. सगळ्याच पक्षांकडे ते उमेदवारीची इच्छा व्यक्‍त करत आहेत. पुरुषोत्तम जाधव यांनी मांडलेला हा सवता सुभा कितपत टिकेल, याचेही कुतूहल आहे. 

शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी यापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उदयनराजेंचे कौतुक करून शिवसेना छत्रपतींविरोधात उमेदवारच देणार नाही, असे जाहीर करून टाकले होते. त्याच वेळी त्यांनी उदयनराजेंना बिनविरोध करा, असे सांगत सामन्यातून जणू माघार घेतल्याचाच पवित्रा जाहीर करून टाकला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना मेळाव्यात त्यांनी आपल्या भूमिकेत थोडी दुरुस्ती केली. उदयनराजे राष्ट्रवादीतर्फे लढले तर आमचा विरोध राहील. छत्रपती म्हणून लढले, तर त्यांना बिनविरोध निवडून देऊ, असे विधान रावते यांनी केले आहे. मात्र, त्याच वेळी नितीन बानुगडे-पाटील हे लोकसभेचे उमेदवार नसतील, असे त्यांनी सांगितल्याने एकप्रकारे विरोधाची हवाच काढून टाकली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून कोण लढणार, याविषयीही उत्सुकता आहे.  रिपाइंनेही स्वतंत्र लढायचे ठरवले असले, तरी अद्यापही त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली नाही. 

गत निवडणुकीचा निकाल व त्यानंतरची पाच वर्षे यामध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे उदयनराजेंना विरोधकांचे आव्हान नाही. त्यांना जे काही आव्हान आहे, ते पक्षांतर्गत आहे. त्यावर ते कशी मात करतात, यावर त्यांचे हॅट्ट्रिकचे गणित अवलंबून असेल. 

2014 चा निकाल

उदयनराजें : 5 लाख 22 हजार 531 
पुरुषोत्तम जाधव : विरोधी अपक्ष, 

1 लाख 55 हजार 937  
उदयनराजेंनी अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांचा साडेतीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

रामराजेंची भूमिका काय राहणार?

विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये विस्तवही जात नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी दिल्लीत चर्चा केल्यानंतर शिवेंद्रराजेंची भूमिका काहीशी मवाळ झाली आहे; मात्र रामराजे व उदयनराजेंमध्ये अद्यापही पॅचअप नाही. रामराजेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्ह्यात सर्वच आघाड्यांवर प्रबळ आहे. विधानसभेच्या आमदारांचेही रामराजेंना पाठबळ असते. त्यामुळे राष्ट्रवादीने उदयनराजेंना जरी उमेदवारी दिली, तरी शरद पवार यांना रामराजेंचा व उदयनराजेंचा समझोता घडवून आणावा लागणार आहे. 

मतदार संख्या
एकूण 19,23,477