Sun, May 19, 2019 22:08होमपेज › Satara › खंदारेवर आणखी एक सावकारीचा गुन्हा

खंदारेवर आणखी एक सावकारीचा गुन्हा

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

नगरसेवक बाळू खंदारे हा सावकारीप्रकरणी अटकेत असताना शनिवारी त्याच्यासह खंड्या धाराशिवकर व 9 जणांच्या टोळीवर आणखी एक सावकारी, दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ट्रक व्यावसायिकाने खंड्याकडून 2 लाखांचे कर्ज घेतल्यानंतर या टोळीने त्या बदल्यात 34 लाखांचे 3 ट्रक व रोख 1 लाख 60 हजार रुपये जबरदस्तीने घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
खंड्या धाराशिवकर, अमोल जाधव, बाळू खंदारे, गणेश, अमोल देशमुख, समाधान ओव्हाळ, अजित कुरणे, लाला पंडित, सागर (पूर्ण नाव, वय, पत्ता माहीत नाही) या टोळीवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अल्फाज सलीमखान पठाण (वय 42, सध्या रा. विकासनगर मूळ रा.रहिमतपूर) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या मुलाचा ट्रक व वाळूचा व्यवसाय होता. 2014 मध्ये तक्रारदाराच्या मुलावर तहसील व आरटीओ कार्यालयाची कारवाई झाल्याने मोठ्या रकमेचा दंड भरावा लागला होता. याचदरम्यान ट्रक व वाळू व्यवसायामध्ये तोटा झाल्याने तक्रारदार व त्यांच्या मुलाने खंड्या धाराशिवकर याच्याकडून 10 टक्के व्याजाने 2 लाख रुपये घेतले. यावेळी खंड्याने कोरे स्टॅम्पवर त्यांच्या सह्याही घेतल्या.
व्याजाने पैसे घेतल्यानंतर दरमहा 20 हजार रुपये खंड्या धाराशिवकरला दिले जात होते. पैसे फेडल्यानंतरही आणखी रक्‍कम शिल्‍लक असल्याचे सांगून खंड्याने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यातूनच खंड्याने कोर्‍या स्टॅम्पचा गैरवापर करत तक्रारदाराच्या मुलाला 1 ट्रक देण्यास सांगितले व खंड्याने तो जबरदस्तीने ताब्यात घेतला.

यावेळी संशयितांनी तक्रारदाराच्या मुलाचे  अपहरण करुन त्याला मारहाण व दमदाटी, शिवीगाळ केली. व्याजाने घेतलेले पैस व ट्रक देवूनही खंड्या मुद्दल शिल्‍लक असल्याचे सांगून त्रास देत होता. त्यातूनच दि. 8 जानेवारी 2016 रोजी तक्रारदाराच्या मुलाचा दुसरा ट्रकही जबरदस्तीने घेतला. दोन्ही ट्रक व पैसे दिल्यानंतर तक्रारदाराच्या मुलाने कोल्हापूर येथून तिसरा ट्रक विकत घेतला. त्या ट्रकद्वारे व्यवसाय सुरु असताना बाळू खंदारे याने तक्रारदाराच्या मुलाला रहिमतपूर - गोजेगाव रस्त्यावर अडवले. ‘तू खंड्याच्या नादाला लागू नको. मी सर्व विषय मिटवून टाकतो. त्यासाठी 1 लाख 60 हजार मागितले. मात्र पैसे नसल्याने तो ट्रक भंगारात घालण्यास सांगून बाळू खंदारे याने 1 लाख 60 हजार रुपये घेतले.’ अशाप्रकारे तक्रारदाराच्या मुलाने 2 लाख रुपयांच्या बदल्यात खंड्या धाराशिवकर, बाळू खंदारे व त्यांच्या टोळीने 34 लाखाचे 3 ट्रक व रोख 1 लाख 60 असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला.

तीनच दिवसांपूर्वी बाळू खंदारे याला शहर पोलिसांनी सावकारीप्रकरणी अटक केली आहे. बाळूला अटक झाल्याचे समजताच तक्रारदाराने शनिवारी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बाळू खंदारे हा सातारा नगरपालिकेचा नगर विकास आघाडीचा विद्यमान नगरसेवक आहे. त्याच्यावर सद्यस्थितीला दोन सावकारीचे व सुरुचि राडा प्रकरणातील दोन गुन्हे दाखल आहेत.