Thu, Jul 18, 2019 06:06होमपेज › Satara › गाड्या भंगारात विकून विमा कंपन्यांनाना गंडा (video)

गाड्या भंगारात विकून विमा कंपन्यांनाना गंडा (video)

Published On: Feb 17 2018 3:14PM | Last Updated: Feb 17 2018 3:29PMसातारा : प्रतिनिधी

नवीन ट्रक भंगांरमध्ये विकून विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नवीन ट्रक खरेदी करून काही महिने त्याचा वापर करून स्वत: मालकानेच ट्रक भंगारामध्ये विकला. त्यानंतर पोलिसांमध्ये ट्रक चोरीची खोटी फिर्याद देऊन विमा रक्कम लाटणाऱ्या ट्रक मालकासह एका टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी)ने पर्दाफाश केला. याप्रकरणी ट्रकचा मालक व तीन भंगार व्यवसायिकांना अटक करण्यात आली आहे. 

त्यांच्याकडून २३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात ट्रक चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे ट्रक चोरी करणार्‍या संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी एलसीबीला दिले होते. रविवारी पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दोन व्यक्ती चोरीचा ट्रक भंगारमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे व शशिकांत मुसळे यांनी पोलिस पथकाच्या सहाय्याने सातारा-खिंडवाडी येथे गस्त घातली. खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकची  चौकशी केल्यानंतर ट्रक  भंगारामध्ये नेत असल्याची कबुली दोन इसमांनी दिली. 

या प्रकरणाचा अधिक तपास केला असता कोल्हापूर येथील भंगार व्यवसायिकांकडून हा ट्रक खरेदी केल्याचे त्या दोघांनी सांगितले. त्यावरून त्या भंगार व्यवसायिकाला ताब्यात घेतल्यानंतर ट्रकच्या मालकानेच हा ट्रक आपल्याला विकल्याचे त्याने कबुल केले. ट्रक मालक अतुल सुभाषचंद्र साळुंखे (वय ३३) रा. त्रिमुर्ती कॉलनी, गोडोली, सातारा याने परस्पर ट्रक भंगार व्यवसायिकाला विकून इस्लामपूर (जि. सांगली), म्हापसा (गोवा) व सातारा या ठिकाणी खोट्या फिर्यादी दिल्या. खोट्या फिर्यादी देऊन इस्लामपूर येथून चोरीस गेलेल्या ट्रकची विम्याची रक्कमही हडपली आहे.

यामध्ये आसिफ रफिक पठाण (वय २९) रा. करवीर, जमिर इब्राहिम हारचीकर (वय ४०) रा. जवाहरनगर व अन्वर दाऊद कच्छी (वय ५६) रा. संभाजीनगर जि. कोल्हापूर यांनी हे चोरीचे ट्रक खरेदी केले होते. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील ६ सांगलीतील १ व गोवा येथील कार चोरीचा १ गुन्हा असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. यांच्याकडून १ ट्रक आणि १ एसयूव्ही कार जप्त करून २३ लाख २ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.