Fri, Mar 22, 2019 01:37
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › राजे हो, कारखानदारी वाढवा : पवार

राजे हो, कारखानदारी वाढवा : पवार

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:11PMसातारा :  प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात उसाचा कारखाना सोडला तर या ठिकाणी दुसरा कोणताही कारखाना दिसत नाही. कारखाने कुठेे गेले या खोलात मला जायचे नाही. मात्र, याची खबरदारी हणमंतराव गायकवाड यांनी घ्यावी. सातार्‍यात दोन्ही राजेंचे सहकार्य मिळवण्यात जो यशस्वी होतो, तोच यशस्वी होतो. ते कसे हे सांगण्याची गरज नाही. सातार्‍यात कारखानदारी वाढवण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे, असा चिमटा खा.शरद पवार यांनी काढला.

सातारा मेगा फूड पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खा. पवार म्हणाले, सातार्‍यात हणमंतराव गायकवाड फूड पार्क प्रकल्प उभारणीसाठी दोन्ही राजेंची मने जिंकण्यात यशस्वी झाले. हणमंतराव गायकवाड यांना सहकार्य करून सातार्‍यात कारखानदारी वाढवण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. खा. श्री. छ. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे.

या दोघांचे सहकार्य ज्याला मिळाले तो नशिबवानच म्हणायचा. त्यामुळे तुम्हाला खरोखरच मानले पाहिजे,  असा मिश्किल टोलाही शरद पवार यांनी लगावला. सातार्‍यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सातारा परिसरातील एमआयडीसीतील कारखाने का टिकत नाहीत, यावर आता मी बोलत नाही. ते सर्व माझ्या कानावर आहे. शेतकर्‍यांसाठी उभारलेला हा प्रकल्प टिकण्यासाठी व वाढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. त्याचवेळी हणमंतराव काळजी घ्या, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.