होमपेज › Satara › संशयिताच्या घराची झडती

संशयिताच्या घराची झडती

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 12:11AMसातारा : प्रतिनिधी

हिरापूर (ता. सातारा) येथे सापडलेल्या बेकायदा गर्भपात औषध साठाप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केलेल्या  विलास देशमुख (सध्या रा. मलकापूर) याच्या मलकापूर येथील घराची झाडाझडती घेतली. संशयित देशमुख हा सध्या एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून अनेक जिल्ह्यात  काम करत असल्याचे समोर आले आहे. 
बेकायदा गर्भपात औषधाचा साठा सातारा शहरालगत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सुरुवातीला सातारा तालुका पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला. विजय प्रकाश संकपाळ, अमीर महमूद खान (दोघे रा.हिरापूर), प्रशांत नामदेव शिंदे (रा. अंबेदरे रोड) व विलास पांडुरंग देशमुख (रा. मलकापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सातारा तालुका पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बाळासाहेब देशमुख याला सातार्‍यातून अटक केली. पहिली अटक झाल्यानंतर याप्रकरणी सोमवारी विलास देशमुख याला ताब्यात घेऊन दुसरी अटक केली. विलास देशमुख सध्या पोलिस कोठडीत असून पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान संशयित विलास देशमुख हा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे व मुंबई येथे एमआर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहेे. यामुळे संशयिताचे मोठे नेटवर्क असून गर्भपात किट विक्रीमध्ये रॅकेट वाढण्याची शक्यता बळावली आहे. तसेच सोमवारी एलसीबी पोलिसांनी देशमुख याच्या मलकापूर येथील घराची झडती घेतली असून, रात्री उशिरापर्यंत त्याचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या सर्व घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रांत खळबळ उडाली असून विलास देशमुख याच्याकडून अनेकांची नावे बाहेर येण्याची शक्यता बळावली आहे.