होमपेज › Satara › अवघा सातारा सुसाट!

अवघा सातारा सुसाट!

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:35PMसातारा : प्रतिनिधी

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या 7 व्या पर्वात  ऐतिहासिक राजधानीसह देश-विदेशातील स्पर्धकही सुसाट धावले.  

यवतेश्‍वर घाटात  ‘हर हर महादेव’चा गजर झाला अन् स्पर्धकांना  आणखी ऊर्जा मिळाली. रविवारी झालेल्या या स्पर्धेत रिमझिम बरसणार्‍या सरी अंगांवर झेलत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह सुमारे 8 हजारांहून अधिक स्पर्धक उत्स्फूर्तपणे दौडले. जोशपूर्ण आणि उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुन्हा एकदा इथिओपिया व केनियाच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. 

गेल्या काही दिवसांपासून सातारा हिल हाफ  स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकतेचे वातावरण होते. अखेर रविवारी मोठ्या उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात या स्पर्धेला प्रारंभ झाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, पीएनबी मेटलाईफ व स्केचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मॅरेथॉन असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. 

स्पर्धेपूर्वी फटाक्यांची जोरदार आतिषबाजीही करण्यात आली. भल्या सकाळी बरोबर सहाचा ठोका पडल्यानंतर स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिक ‘जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, कम ऑन, किप इट अप’ अशा घोषणा देत टाळ्या वाजवत होते. तसेच रस्त्याच्या प्रत्येक 100 मीटर अंतरावर स्पर्धकांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती. ढोल, ताशा, लेझीम या पारंपारिक वाद्यांनी स्पर्धेत आणखी रंगत आणली. हलगीच्या कडाकडाटाने स्पर्धकांना आणखी जोश आला. काळवंडलेले आभाळ, रिमझिम बरसणार्‍या सरी, दाट धुके, बोचरी हवा स्पर्धकांचा  उत्साह आणखी वाढवत होती.
अल्हाददायक अशा  वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत 8 हजाराहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्यामुळे रस्ते गजबजून गेले होते.  मुख्य 21 कि.मी.च्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 6 हजार 500 स्पर्धक तर  3 कि. मी.च्या हिरोज रनसाठी 1 हजार 500 स्पर्धक धावले. यामध्ये महिला व तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसून आला. यावेळी नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तुडूंब गर्दी केली होती. या स्पर्धेत 2  वर्षांच्या चिमुरड्यापासून 90 वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांनी या स्पर्धेत धाव घेतली. दिवसेंदिवस या स्पर्धेची लोकप्रियता वाढत असल्याने विदेशी स्पर्धकांचीही संख्या लक्षणीय राहिली. 

सातारा तालीम संघ मैदान येथून स्पर्धेस प्रारंभ झाला. ही स्पर्धा कमानी हौद, देवी चौकमार्गे राजपथ, मोती चौक, राजवाडा, गोल मारुती मंदिरमार्गे समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्‍वर घाट, हॉटेल निवांत, प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे गणेश खिंडीच्या पुढील पठारामार्गे जावून पुन्हा त्याच मार्गे समर्थ मंदिर, अदालतवाडा, केसरकर पेठ, नगरपालिका, दिग्विजय चौकमार्गे पुन्हा तालीम संघावर पोहचली. हजारो स्पर्धकांमुळे या मार्गावरील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. 

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच इथिओपिया व केनियाच्या खेळाडूंनी आघाडी घेतली होती. स्पर्धेतील अर्धे अंतर चढणीचे असल्यामुळे स्पर्धकांची दमछाक होत होती. मात्र, तरीही उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.  एकमेकांना प्रेरणा देत सर्वजण स्पर्धेचे अंतर कापत होते. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करत होते. भारतीय खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह उतरून चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. स्पर्धेत अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला होता. यांचे सातारकरांनी विशेष कौतुक करत त्यांना धावण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

उद्घाटन कार्यक्रमास मॅरेथॉन असोसिएशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे, रेस डायरेक्टर देवदत्त देव, सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्ष सुजीत जगधणे, उपाध्यक्ष डॉ. प्रताप गोळे, अ‍ॅड.कमलेश पिसाळ, डॉ.शेखर घोरपडे, सीए.विठ्ठल जाधव व सचिव डॉ.सुचित्रा काटे, डॉ. निलेश थोरात, जितेंद्र भोसले, कन्हैय्या राजपूत यांच्यासह मॅरेथॉन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील,  विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट हेही धावले. 

पारितोषिक वितरण समारंभ औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार व समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.