Thu, Jul 18, 2019 05:04होमपेज › Satara › गुंड दत्ता जाधवला अटक (Video)

गुंड दत्ता जाधवला अटक (Video)

Published On: May 04 2018 9:07PM | Last Updated: May 04 2018 9:07PMसातारा : प्रतिनिधी

मोक्‍कामधील संशयित आरोपी कुख्यात गुंड दत्ता जाधव याला सातारा पोलिसांनी शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगर येथून अटक केली. या घटनेनंतर परिसरासह सातार्‍यात खळबळ उडाली असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस व्हॅन बिघडल्याने सातार्‍यातून चालवत पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यात आले. दत्ता जाधवची ही ‘वरात’ अनेकांनी रस्त्यावरून पाहिली. दरम्यान, गेल्याच आठवड्यात जत येथे त्याला पकडण्यासाठी गेलेल्या सातारा, सांगली पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने पोलिस दलालाच आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले होते.

गुंड दत्ता जाधव याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यासह इतर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. सावकारीप्रकरणी नुकताच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्‍काअंतर्गत प्रस्ताव तयार करून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी त्याच्यावरील मोक्‍काला हिरवा कंदील दाखवल्यानंतर तो सातार्‍यातून पसार झाला.

गुंड दत्ता जाधव याच्याविरुद्ध मोक्‍काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांसह जिल्हा पोलिस दल त्याचा शोध घेत होते; मात्र तो सातार्‍यातून पसार झाला होता. गेल्याच आठवड्यात गुंड दत्ता जाधव हा जत येथे असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर सातारा व जत (जि. सांगली) येथील पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रतापपूर (ता. जत) येथे रात्री गेले होते. सातारा पोलिसांना पाहताच दत्ता जाधव अंधाराचा व यात्रेचा गैरफायदा घेऊन तेथून निसटला. पोलिसांनी दत्ता जाधव याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताच गुंड दत्ता जाधव याच्या साथीदारांनी पोलिसांनाच घेरले. पोलिस दत्ताचा पाठलाग करू नये, यासाठी जमाव पोलिसांच्या आडवा पडून पोलिसांनाच धक्‍काबुक्‍की केली. संशयितांना पोलिसांना पकडताच गुंड दत्ता जाधव याच्या साथीदारांनी पोलिसांना आव्हान देत थेट दगडफेक केली. या घटनेत महिला पोलिसांसह सातारा, सांगली पोलिस जखमी झाले होते.

पोलिसांनी याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करुन संशयितांची धरपकड केली. गुंड दत्ता जाधव मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला होता. शुक्रवारी दुपारी मात्र सातारा पोलिसांना दत्ता जाधव बाबतची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळत फलटण, वाठार स्टेशन, एलसीबी येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना बरोबर घेवून सापळा रचला. शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दत्ता जाधव प्रतापसिंहनगरामध्येच असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवले. पोलिसांनी परिसराला व त्याला घराला वेढा दिल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात अलगद सापडला. गुंड दत्ता जाधव सुरुवातीला पोलिसांना बधत नव्हता. त्यातच परिसरात त्याचे साथीदार जमावाने एकत्र जमू लागले.

पोलिसांनी धडाकेबाज भूमिका घेत त्याला पोलिस व्हॅनमध्ये घातला. काही अंतरावर गेल्यानंतर पोलिस व्हॅन बिघडल्याने दत्ता जाधव याला खाली उतरवून पायी चालवत सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यात आले. त्यामुळे प्रतापसिंहनगरातून सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत पायी चालवत आणल्याने सातारा शहरात त्याची वरातच निघाली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सातारकरांनी स्वागत केले असून प्रतापसिंहनगर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीने हैराण असलेल्या सातारकरांना दत्ता जाधवच्या अटकेने दिलासा मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया सातारकरांनी जाहीरपणे व्यक्‍त केल्या. 

संदीप पाटलांचा धडाका 

सातार्‍यात आजवर आलेल्या जिल्हा पोलिसप्रमुखांपैकी बर्‍याच जणांनी केवळ शायनिंग केली. गप्प राहून थेट कारवाई करण्यात यशस्वी झाले ते संदीप पाटील. सातारा जिल्ह्याच्या गुन्हेगारी निर्मूलनाचा विडा उचलत संदीप पाटील यांनी एका पाठोपाठ एक धाडसी कारवाया केल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी आपल्या भात्यातला वेगवेगळा बाण वापरत पाटील यांनी सातार्‍यातील गुंडगिरी पुरती संपुष्टात आणली आहे. गुन्हेगारी विश्‍वातले एक एक मोहरे उचलताना दत्ता जाधव हा फार मोठे आव्हान बनून राहिला होता. संदीप पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांना बरोबर घेऊन दत्ताची गठडी वळण्याचा प्लॅन रचला. एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, सातार्‍याचे पोनि नारायण सारंगकर यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले आणि अखेर दत्ता गजाआड झाला. 

पोलिसांनी गच्च पकडली होती दत्ताची मान... 

गुंड दत्ता जाधव याला पोवई नाका मार्गे पोलिस ठाण्यात आणताना रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. पोलिसांच्या या गराड्यामध्ये कोणाला अटक करून त्याची वरात काढली, अशी चर्चा सुरू होती. दत्ता जाधव याला आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीममध्ये 12 ते 15 जणांचा समावेश होता. जाधव याला पोलिस ठाण्यापर्यंत आणताना पोलिसांना रस्ता मोकळा करावा लागत होता. पोलिस दत्ता जाधवला रस्त्याने घेऊन जात असल्याने थोडी फार वाहतूक कोंडी झाली होती. जाधवला थेट घरातून उचलून आणल्यमुळे त्याला बेड्या ठोकल्या नव्हत्या. तर दोन पोलिसांनी त्याची मान धरली होती. तसेच पुन्हा एकदा पसार होण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याच्या समर्थकांकडून हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी 5 पोलिस स्टिक घेऊन चालत होते. पोलिस ठाण्यामध्ये दत्ता जाधवला आणल्यानंतर गर्दी एकदम वाढली. त्यामुळे पोलिसांना ठाण्यातून जमाव पांगवावा लागला. 

Tags :