Sat, Sep 22, 2018 11:30



होमपेज › Satara › अंबवडे बुद्रकचा ग्रामसेवक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

अंबवडे बुद्रकचा ग्रामसेवक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 17 2018 1:32AM

बुकमार्क करा




सातारा : प्रतिनिधी

बांधकाम केलेल्या घराची नोंद करून उतारा देण्यासाठी व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 1 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना अंबवडे बुद्रक (ता. सातारा) चा ग्रामसेवक सचिन भरतराव गायकवाड (वय 37) याला लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 
तक्रारदारांनी अंबवडे बुद्रक येथे घराचे नवीन बांधकाम केले आहे. या घराची नोंद करून उतारा व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी सचिन गायकवाड याने तक्रारदारांकडे 2 हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीअंती 1 हजार 500 रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर याची पडताळणी करण्यात आली. यामध्ये तथ्य आढळल्यानंतर मंगळवारी अंबवडे बुद्रक येथे सापळा रचून गायकवाड याला 1 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बी. एस. कुरळे, आरिफा मुल्ला, हवालदार आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, संभाजी बनसोडे, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, विनोद राजे, अजित कर्णे यांनी कारवाईत सहभाग घेतला. लाच  मागणीसंदर्भात काही तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.