Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Satara › साविआ नगरसेवकांमध्ये खडाजंगी 

साविआ नगरसेवकांमध्ये खडाजंगी 

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 12:02AMसातारा : प्रतिनिधी

सातारा विकास आघाडीत बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस सोमवारी चव्हाट्यावर आली. बैठकीत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम तसेच नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांच्यात वाद झाला, तर प्रभागातील कामांसंदर्भात कल्पना दिली जात नसल्याची तक्रार करत ज्ञानेश्‍वर फरांदे व नगरसेविका लता पवार यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान, 
सर्वसाधारण सभेतील विषयांसंदर्भात माहिती दिली जात नसल्याने 

विरोधकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सत्ताधार्‍यांची तक्रार केली. सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 10) सकाळी बोलावली आहे.  या सभेसमोर 25 विषय चर्चेसाठी घेण्यात आले आहेत. सभेच्या पार्श्‍वभूमीवर साविआने सोमवारी सकाळी 11 वाजता कमिटी हॉलमध्ये आघाडीची बैठक बोलावली होती. या बैठकीस साविआचे बरेच नगरसेवक उपस्थित होते. करंजे परिसरात होत असलेल्या कामांबद्दल सांगितले जात नाही. कोण, कुठं, कोणती काम करतंय हे कळत नसल्याचे सांगत नगरसेवक ज्ञानेश्‍वर फरांदे तसेच लता पवार यांच्यात जोरदार वाद झाला. दोघांनीही एकमेकांवर आरोप केले.

याचवेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम तसेच सुजाता राजेमहाडिक यांच्यातही खटके उडाले. सभेसाठी सुचवलेले बरेच विषय विषयपत्रिकेवर न आल्याने नगराध्यक्षा कदम तसेच राजेमहाडिक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कामे होत नसल्याने काही नगरसेवकांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला. सातारा विकास आघाडीमध्ये कलह सुरु असतानाच नगर विकास आघाडी तसेच भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी सभेसमोर मंजुरीसाठी घेतलेल्या विषयांचे प्रस्ताव पाहण्यासाठी द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, सभा अधीक्षक राजेश काळे हे रजेवर असल्याने हे प्रस्ताव सत्ताधार्‍यांना त्यावेळी देता आले नाहीत.

प्रस्ताव देण्यास विलंब झाल्याने  विरोधी  पक्षनेते अशोक मोने, सभागृह नेते अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, भाजपचे गटनेते धनंजय जांभळे, रवींद्र ढोणे, विजय काटवटे, सागर पावशे, राजू गोरे यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेतली. सत्ताधार्‍यांच्या मनमानीची तक्रार करत त्यांनी दि. 10 रोजी बोलावलेली सभा रद्द करावी, अशी मागणी केली. दरम्यान, विरोधी नगरसेवकांना सायंकाळी सर्व प्रस्ताव, कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे साविआकडून  सांगण्यात आले.
 

 

 

tags : Satara,news,General,Meeting,Satara, Municipal, Corporation, Mayor ,Corporator, Dispute,