Tue, Jul 16, 2019 10:16होमपेज › Satara › बच्चनना सातार्‍यात घेऊन येणारच

बच्चनना सातार्‍यात घेऊन येणारच

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:12AMसातारा: प्रतिनिधी

माझी कमिटमेंट ही फक्‍त माझ्या सातारकरांशी आहे अन्य कोणाशीही नाही. सातारकरांनी जे पद त्यांच्या हृदयात दिले आहे ते खासदारकीच्या पदापेक्षा मोठे आहे. राजधानी महोत्सवात आता जरी अमिताभ बच्चन आले नसले तरी मी त्यांना दिवाळीत सातार्‍यात घेऊन येणारच आहे, असे  आश्‍वासन खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनी दिले. 

छ. शाहू क्रीडा संकुलामध्ये आयोजित राजधानी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी राजमाता श्री छ. कल्पनाराजे भोसले, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर, पणन मंत्री ना. सदाभाऊ खोत, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार कांताताई नलवडे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि. प.चे सीईओ डॉ. कैलास शिंदे, सदाशिव सपकाळ, डॉ. दिलीप येळगावकर, ऋषिकांत शिंदे, अमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

खा. उदयनराजे म्हणाले, कॉलरबद्दल सांगायचे झाल्यास आपण कोणतेही काळे कृत्य करत नाही. उजळपणे जे मला वाटते ते करतो. अन्यायाविरूद्ध मी कायमच आवाज उठवत आलो आहे. या महोत्सवातून कलाकारांच्या गुणांना वाव मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. 

ना. महादेव जानकर म्हणाले, जनतेचा राजा कसा असावा, हे खा. उदयनराजेंनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने अनेकांनी पक्ष काढून सत्ता मिळवल्या आहेत. उदयनराजेंमध्ये राजकीय गड जिंकण्याची ताकद आहे. आता मोठ्या नव्हे तर छोट्या पक्षांना महत्त्व आले आहे. खा. उदयनराजेंना नव्हे तर राजकीय पक्षांना त्यांची गरज आहे. ज्या प्रकारे त्यांची लोकप्रियता आहे त्यापुढे खासदार हे पद छोटेच आहे. 

ना. सदाभाऊ खोत म्हणाले, सर्व नेत्यांसाठी पक्ष असतात. मात्र, खा. उदयनराजेंनी पक्ष हा त्यांच्यासाठी असल्याचे दाखवून दिले आहे.  खा. उदयनराजेंची कॉलर वर उडवण्याची स्टाईल ही वेगळी आहे. त्यामुळे याची सातार्‍यात फार चर्चा होते. त्यामुळे कॉलर उडवावी ती महाराजांनीच, ते ऐर्‍यागैर्‍याचे काम नाही. खा. उदयनराजेंनी राजधानी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जपली आहे. ती अशीच व्यापक होत जावी, अशी अपेक्षा ना. खोत यांनी व्यक्‍त केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सातारा गौरव पुरस्काराने कै. यमुनाबाई वाईकर (मरणोत्‍तर), श्‍वेता शिंदे, ललिता बाबर, पुरुषोत्‍तम शेठ सर, नंदकुमार विभुते, अजित मुथा, गुरुवर्य बबनराव उथळे, रफीक मुल्‍ला, राजू घुले, माहेश्‍वरी चॅरिटेबल ट्रस्ट, मेजर गौरव जाधव, संतोष सूर्यवंशी, अजित खताळ, विजयकुमार निंबाळकर यांचा गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यानंतर एकापेक्षा एक सरस असे नृत्यांचे परफॉर्मन्स सादर करण्यात आले. त्याला सातारकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. नॅशनल चॅम्पियन पै. तानाजी शेडगे व जिल्हा बार असो.चे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुश जाधव यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

खा. श्री छ. उदयनराजे भोसले मित्र समुहाने कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले. 

कॉलर नसलेले शर्ट घालावेत का? : खा. उदयनराजे

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे सातारा दौर्‍यावर आले असताना स्वत:ची कॉलर उडवून निवडणुका आल्या की सर्वांच्या कॉलर माझ्यासमोर सरळ होतात, असा टोला लगावला होता.  त्यांच्या या वक्‍तव्यानंतर प्रथमच खा. उदयनराजे राजधानी महोत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर आले. त्यांची एंट्रीही एकदम जोरदार झाली. एंट्रीवेळीच त्यांनी कॉलर उडवली. त्यांच्या या स्टाईलला मैदानातील प्रत्येकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर व्यासपीठावर बोलताना त्यांनी माझ्या कॉलरची आता एवढी चर्चा झाली आहेे की आता कॉलर नसलेले शर्ट मी घालावे का? असा प्रश्‍न पडला आहे. मग असा विचार येतो की कॉलर नसेल तर तुम्ही ओळखणार कसे? म्हणून आपण कॉलर ठेवत असल्याचे खा. उदयनराजेंनी स्पष्ट केले.

उपस्थित राहता न आल्याची खंत : अमिताभ

राजधानी महोत्सवास उपस्थित राहता आले नाही याची मला खंत आहे. त्याबद्दल छत्रपती घराण्याकडे मी दिलगिरी व्यक्‍त करतो. छत्रपती  घराण्याच्या वतीने देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत असल्याचे सुपरस्टार सिनेअभिनेते अमिताभ बच्चन  यांनी फोनवरून  आवर्जून सांगितले.