Thu, Mar 21, 2019 11:09होमपेज › Satara › गुन्हेगारांवर दहशत बसवून ‘एस.पी.’ निघाले 

गुन्हेगारांवर दहशत बसवून ‘एस.पी.’ निघाले 

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:48PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली असून दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी सातार्‍यातील गुन्हेगारीचा बिमोड केला आहे. प्रामुख्याने संघटीत गुन्हेगारी (मोक्का) व तडीपारी अंतर्गत जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कंबरडेच मोडले असून सातारा पोलिसांची गुंडांवर दहशत बसवणारे व नावातच ‘एस.’ ‘पी.’ असणारे डॅशिंग संदीप पाटील असा त्यांचा लौकीक जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद ठरला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दि. 16 जून 2016 मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार हाती घेतला. त्याअगोदर ते संवेदनशील असणार्‍या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. गडचिरोलीतून सातार्‍यात हजर होत असताना त्यांनी ‘बुके नको बुक आणा’ असे  आवाहन सातारकरांना  केले आणि जिल्हावासियांनीही त्यांची एक पुस्तक देऊन भेट घेतली. जमा झालेली ही सर्व पुस्तके मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलिस व्हॅनभरुन गडचिरोलीला तेथील नागरिकांच्या प्रबोधनासाठी पाठवली. अशाप्रकारे वाचनसंस्कृतीची यशस्वी संकल्पना त्यांनी राबवून समाजापुढे एक नवा पायंडा पाडला.

एंट्री होताच संदीप पाटील यांना वाईच्या क्रुरकर्मा डॉ. संतोष पोळ याच्याविरुध्दचे एक निवेदन देण्यात आले. तक्रारीच्या आलेल्या या पहिल्या निवेदनाचा असा छडा लागला की त्यामुळे वाई हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. संशयित डॉ. संतोष पोळ याने एक-दोन नव्हे तर तब्बल सात जणांचे खून करुन ते फार्महाऊसमध्ये पुरल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळ खणून काढल्यानंतर मृतदेहांचे सांगाडे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रच नव्हे तर देशातच खळबळ उडाली.

वाई हत्याकांडाचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातार्‍यातील ‘गुन्हेगारीचा होमवर्क’ करण्यास सुरुवात केली. हा गृहपाठ एवढा पक्‍का झाला की, सातारा शहरासह जिल्ह्यातील सावकारी हे गुन्हेगारीचे मूळ ओळखून त्याच्यावरच त्यांनी घाव घालण्यास सुरुवात केली. याशिवाय सावकारीच्या माध्यमातून खंडणीखोर, गुंडगिरी, पर्यटनस्थळी लुटमार करणार्‍या टोळ्या त्यांनी हेरल्या. सातार्‍यात खंड्या धाराशिवकर याला अटक केल्यानंतर तक्रारदारांची सावकारीसाठी रेल्वेप्रमाणे रांगच लागली. सावकारीत खंड्यासह त्याचे नगरसेवक साथीदार असल्याचे समोर आल्यानंतर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता टोळीमधील दोन नगरसेवकांनाही अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील केवळ सावकारीचे गुन्हे दाखल करुन थांबले नाहीत तर सावकारीच्या विविध टोळ्यांवर त्यांनी थेट मोक्‍काच लावला. प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव याच्याविरुध्दही सावकारीसह विविध गंभीर तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल केले. मोक्‍का लागताच तो सातार्‍यातून पसार झाला. जत येथे असल्याचे समोर आल्यानंतर सातारचे पथक पकडण्यास गेल्यानंतर तेथील पोलिसांवरच गंभीर हल्‍ला झाला. अखेर काही दिवसांतच पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. सद्यस्थितीला त्याच्यासह त्याचा भाऊ, मुलगा यांनाही मोक्‍का लावण्यात आला आहे.

एसपी संदीप पाटील यांच्या या धडाकेबाज कारवायांमुळे नामचीन गुंडांपासून गल्लीबोळातील हुल्लडबाजापर्यंत सारेच दबकून राहिले. थोडी जर गडबड झाली की मोक्का लागणार किंवा तडीपार होणार, अशी पोलिसांची गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच सातारा जिल्ह्यातील क्राईमरेट कमी झाला. एसपी संदीप पाटील यांच्या या ठोस कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. असे असताना त्यांची बदली झाल्याने जिल्हावासियांमध्ये नाराजीची भावना आहे. 

मी ‘प्रतापगड’वरुन ‘शिवनेरीकडे’ निघालोय..

पोलिस अधिक्षक संदीप पाटील हे सातार्‍यातील सैनिक स्कूलचे विद्यार्थी. शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट आयपीएस झाले. तिसरे पोस्टिंग गडचिरोली केल्यानंतर त्यांना चौथ्या पोस्टिंगची चॉईस मिळाली. त्यानंतर त्यांनी सातारा घेतले. ज्या मातीत आपण घडलो आज त्या मातीची सेवा करायला मिळणार यामुळे त्यांना विशेष आनंद होता. दोन वर्षात त्यांनी सातार्‍याच्या भूमीत ‘न भूतो न भविष्यते’ अशीच चोख कामगिरी केली. शनिवारी मात्र त्यांची पुणे ग्रामीणला बदली झाल्याचे वृत्त थडकले. बदलीबाबत त्यांना विचारले असता, ‘मी सातार्‍यातून फार लांब अजिबात गेलो नाही. सातारच्या प्रतापगडावरुन त्याच्या खालीच असणार्‍या पुणे ग्रामीणमधील शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचे भाग्य मिळाले असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

म्हणून एसपी कारमध्ये पुढे बसत होते..

एरव्ही अधिकारी त्यांच्या कारमध्ये पाठीमागे बसून जात- येत असतात. एसपी संदीप पाटील मात्र या बाबीला अपवाद होते. ते नेहमी कारमध्ये पुढेच बसत होते. अधिकार्‍यांमधील हा बदल जाणवल्यानंतर त्यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘कारमध्ये पाठीमागे बसल्यानंतर पुढचे फारसे दिसत नाही. यामुळे आपण ज्या परिसरात काम करतो तेथील वाहतूक व्यवस्थित सुरु आहे ना? कुठे गडबड, गोंधळ सुरु नाही ना? वाहतूक पोलिस कर्तव्यावर आहेत का? या बाबी पुढे बसून पाहता येतात. याशिवाय पाठीमागे उगाचच बसल्यानंतर मोबाईलमध्ये वारंवार लक्ष जाण्याची शक्यताही असते. तसेच कार ही खरतर चार माणसांसाठी असते. जर आपण पाठीमागे बसलो तर इतर कोणीही बसण्याचे धाडस करणार नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये यामुळे फटका बसण्याची शक्यता असते. यामुळेच आपण पाठीमागे न बसता नेहमी पुढे बसतो,’ असे त्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.