Thu, Jul 18, 2019 02:54होमपेज › Satara › प. महाराष्ट्र दोन्ही काँग्रेसची जहागिरी नाही

प. महाराष्ट्र दोन्ही काँग्रेसची जहागिरी नाही

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 10:54PM

बुकमार्क करा
महाबळेश्‍वर : वार्ताहर

पश्‍चिम महाराष्ट्र ही काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जहागिर नाही. पश्‍चिम महाराष्ट्राच्या सात बारावर त्यांचे नाव कोरलेले नाही. याच पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. मी मोठा की तू मोठा यात न गुरफटता शिवसेनेला मोठे करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने योगदान दिले तर 2019 मध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त आमदार शिवसेनेचे असतील असा विश्‍वास आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा शिवसेना सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ आ. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, दगडूदादा सपकाळ, माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, चंद्रकांत जाधव, हर्षल कदम, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदा जाधव, युवासेनेचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले, डी. एम. बावळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला लाभलेले यश हे भाजपाच्या डोळ्यात खुपल्यानेच त्यांनी युती तोडली. युती तोडल्यानंतर तयारीला कमी वेळ मिळाल्यानंतरही शिवसेनेने 63 जागा मिळाल्या. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न अपूर्ण आहे. ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात 60 हजार सभासद नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एकत्र या.

दगडूदादा सपकाळ म्हणाले,  सातारा जिल्हा कोणाच्या बापाची इस्टेट नाही. पैशाच्या जीवावर जिल्ह्यात राजकारण करणार्‍यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे तयारीसाठी आता भरपूर वेळ आहे. मुंबईचा शिवसैनिक इकडे राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचे काम करतो. तिकडे एक बाप आणि गावाकडे दुसरा बाप हे आता चालणार नाही. 

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, शिवसेनेची  भूमिका विचार व केलेली विकास कामे ही तळागाळातील लोकांपर्यंत पाहेचवण्याचे काम सभासद नोंदणी अभियानाच्या माध्यमातून करायचे आहे. सभासद नोंदणीच्या जिवावर जिल्ह्यात जास्त आमदार शिवसेनेचे निवडून आणण्याचे शिवधनुष्य उचलायचे आहे. सरकारमध्ये काम करताना आपल्याला मर्यादा पडतात म्हणून राज्यात आपणास स्वबळावर सत्ता आणायची आहे.

यावेळी चंद्रकात जाधव, राजेश कुंभारदरे व हर्षल कदम यांनी मनोगत व्यक्‍त केले. दरम्यान, यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, एस. एस पारठे, युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे, तालुकाप्रमुख नितिन भिलारे, शहरप्रमुख आकाश साळुंखे, संजय ओंबळे संजय कासुर्डे व शिवसैनिक उपस्थित होते.