Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Satara › सातारा विकास आघाडीतील दुफळी चव्हाट्यावर

सातारा विकास आघाडीतील दुफळी चव्हाट्यावर

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 10:59PMसातारा :  प्रतिनिधी 

सातारा विकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. त्यावरून रविवारी सकाळीच आघाडीतील दोन्हीही नाराज गटांना खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलावून घेतले. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या बाजूने संख्याबळ जास्त असले तरी सभागृह नेत्या स्मिता घोडके यांनीही त्या चुकीच्या कशा वागतात, हे प्रखरपणे खासदार उदयनराजे यांच्यासमोर मांडले. 

नगराध्यक्षा माधवी कदम यांची बाजूही काही ज्येष्ठ नगरसेवकांनी     उचलून धरली. दोन्हीही बाजूचे ऐकून घेत उदयनराजेंनी दोन्ही गटांना फटकारत उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता जलमंदिरवर पुन्हा बैठक बोलवली आहे. त्यामुळे साविआतील नाराजीचा फैसला राजेंच्या कोर्टात आज होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. दरम्यान, या बैठकीत अ‍ॅड. दत्ता बनकर आणि निशांत पाटील हे नगरसेवक तटस्थ भूमिकेत होते.  

सातारा पालिकेत सत्ताधारी असलेल्या साविआमध्येच दुफळी माजली आहे. या दुफळीचे कारण दोन्हीही गटातील नगरसेवकांनाच माहिती आहे.  त्याबाबत मात्र आजपर्यंत खुल्या दिल्याने स्पष्टीकरण झाले नाही. सुरु असलेल्या नाराजीवरुन रविवारी सकाळी जलमंदिर पॅलेस येथे साविआच्या सर्वच नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या विरोधात सभागृह नेत्या स्मिता घोडके, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, ज्ञानेश्वर फरांदे, माजी नियोजन सभापती अल्लाउद्दीन शेख असे सातजण तर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या बाजूने ज्येष्ठ नगरसेवक वसंत लेवे, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर,  नियोजन सभापती स्नेहा नलावडे, लता पवार, विशाल जाधव असे संख्याबळ होते. सभागृह नेत्या स्मिता घोडके यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडून केवळ एकाच नगरसेवकांचे कसे काम केले जाते? इतर नगरसेवकांच्याबाबतीत दुजाभाव केला जातो. केबीनमध्ये माझ्याकडे आलेल्या तक्रारी तुम्हाला सांगते, असे सांगत त्यांनी प्रखरपणे खासदार उदयनराजेंच्या समोर मांडणी केली. तर आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनीही काम करताना कोण अडचण निर्माण करते, आपल्याच भातावर डाळ ओढायचा प्रकार सुरु आहे, अशी कैफियत मांडली.  बांधकाम सभापती मनोज शेंडे यांनीही रस्त्याचे खड्डे भरायचे टेंडरही आपल्याच माणसाला मिळावे यासाठी काहीजण कसे त्रास देतात. परस्पर नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये सर्व काही ठरते, असे आरोप केले. 

नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यावतीने शहराचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न होतो, यांच्याकडूनही हुल उठवली जाते, अशी बाजू खासदार उदयनराजेंच्या समोर मांडली. दुपारपर्यंत ही बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत खासदार उदयनराजेंनी दोन्हीही गटांना चांगलेच बजावून सांगत तुमचं झालय, माझी निवडणूक आहे. जरा सबुरीन घ्या, उद्यापर्यंत मिटवा सगळे आणि लोकांची कामे करा, अशा शब्दात खडेबोल सुनावल्याचे समजते. या सर्व चर्चेमध्ये माजी नगराध्यक्ष निशांत पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता बनकर हे सहभागी झाले नव्हते. त्यामुळे उद्या सोमवार दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता साविआची जलमंदिर पॅलेस येथे बैठक होणार असून खा. उदयनराजेंच्या समोरच साविआतील दुफळीवर तोडगा निघणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.