होमपेज › Satara › सातारा : शाळांच्या गुणवत्तेवर आता ग्रामसभेचे नियंत्रण

सातारा : शाळांच्या गुणवत्तेवर आता ग्रामसभेचे नियंत्रण

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:42PMसातारा : प्रतिनिधी

आमचा गाव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत सन 2016 व 17 ते 2019 व 20 या चार वर्षांचा प्रत्येक गावांचा विकास आराखडा तयार करून त्या आधारे काम करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश दिले आहेत. त्यानुसार  गावांचे विकास आराखडे  तयार करून त्यावर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र सन 2018 व 19 या वर्षांच्या आराखड्यात शाश्वत विकास कामे या गावातील सरल संगणक प्रणालीची माहिती भरणार्‍या सर्व शाळांच्या गुणवत्तेची माहिती दर 3 महिन्यांनी होणार्‍या  ग्रामसभांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कमी गुणवत्ता असणार्‍या  शाळांना गुणवत्ता वाढीसाठी संबंधित ग्रामसभेला उपाय सुचवण्यास सांगण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणार्‍या अनेक ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या  मालकीच्या शाळा, अंगणवाड्या  इमारतीची दुरूस्ती व देखभालीसाठी संबंधीत गावांना  निधीची तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे. गावांचा वार्षिक आराखडा तयार करताना यासाठी नियोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या आदेशात आहेत.

मानव विकास निर्देशंकामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व उपजीविका या क्षेत्रातील उपक्रम आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दारिद्—य निर्मुलन, लिंगभाव समानता, स्वच्छता व सुरक्षित पाणी, शांतता न्याय, सर्वसमावेशक विकास, उद्योजकता, मुलभूत सुविधा यांचा गावांच्या विकास आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.
गावातील प्राथमिक शाळेतील सरल संगणक प्रणालीत शैक्षणिक गुणवत्तेचा अहवाल दर तीन महिन्यांनी होणार्‍या ग्रामसभेत ठेवण्यात येणार आहे. यावेळी संबंधित शाळेचे कामकाज आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचवण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. अंगणवाडीतील स्थिती, कुपोषीत आणि अंगणवाडीच्या  योजना, विविध लसीकरण यावर देखील  ग्रामसभेला  आता लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. अंगणवाडीमधील  बालकांची उपस्थिती, त्यांचा आहार,  कुपोषणाची स्थिती, अंगणवाडीतील सुविधा, गरोदर माता, लसीकरण, आरोग्य तपासणी याची माहिती ग्रामसभेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खर्‍या अर्थाने प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांवर  ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार आहे.

सीईओ, बीडीओंना तपासणीचे अधिकार

आमचा गाव आमचा विकास अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने हाती घेतलेले काम पुर्ण केले आहे की नाही अथवा ती कामे रद्द केली. त्यावर करण्यात आलेला खर्च, त्याचे मुल्यांकन झाले की नाही. पुर्णत्वाचा दाखला घेतला आहे की नाही याचा अभिलेख आदींची तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी पंचायत यांना देण्यात आले आहेत.