होमपेज › Satara › कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज 

कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज 

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:33PMसातारा : प्रतिनिधी

शेतीमालासाठी असलेल्या कोल्ड स्टोअरेजला सवलतीच्या दरात वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. 500 मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यासाठी राज्य सरकारने टेंडर मागवले आहे. त्या माध्यमातून राज्यातील कोल्ड स्टोअरेजला कमी दरात वीज देता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. देवेेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, बीव्हीजीने साकारलेल्या राज्यातील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन सातार्‍यात झाले. बीव्हीजीने साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या सातारा मेगा फूड पार्कचे उद्घाटन केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योगमंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. संजयकाका पाटील,     

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, मेगा फूड पार्कचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक, भारत विकास ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, व्हाईस चेअरमन जॉईंट एम,डी. उमेश माने,  सातारा मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष विजय चोले, संचालक सचिन इटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.   मुख्यमंत्री म्हणाले, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कोल्ड स्टोरेज चेनचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली होती. आता केंद्रीय मंत्री कौर यांच्या रेट्यामुळे आणि पाठपुराव्यामुळे कोल्ड स्टोरेजचे जाळे महाराष्ट्रात देखील पसरत आहे.

कोल्ड स्टोरेज इंडस्ट्री आणि मेगा फुड पार्कर्सच्या माध्यमातून शेतकर्‍याला त्याचा उत्पादीत माल खराब होण्यापासून वाचवता येईल त्याच बरोबर प्रक्रिया उद्योगांच्या मार्फत त्याला योग्य मोबदला मिळेल.   कोल्ड स्टोरेज इंडस्ट्री आणि मेगा फुड पार्कसच्या माध्यमातून शेतकर्‍याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. मधली दलालांची फळी वगळून शेतकरी आणि ग्राहकालाच अंतिम लाभ मिळाला पाहिजे. कोल्ड स्टोरेज इंडस्ट्री आणि मेगा फुड पार्कर्सच्या माध्यमातून शेतकर्‍याला केवळ आर्थिकस्तर वाढेल एवढेच नव्हे तर उत्पादीत मालाची प्रत देखील टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या शेती आणि शेतकरी संर्दभातील असलेल्या धोरणांना समांतर धोरण राज्य सरकार आखत असल्याने योजनांना गतीने आणि प्रभावी पद्धतीने अंमलात आणने सोयीचे जात आहे.

कोल्ड स्टोरेज किंवा मेगा फुड पार्कसारख्या संकल्पनांना चालना मिळण्यासाठी इंडस्ट्रिजच्या दराने वीज न पुरवाता त्यांना कमीतकमी दरात अखंडीत आणि सातत्याने वीज पुरवण्याच्या दृष्टीने देखील वाटचाल सुरु आहे. त्यासाठी सोलर वीज प्रकल्पांना देखील चालाना देऊन औष्णिक वीज प्रकल्पातून होत असलेल्या प्रदुषणाला देखील आळा घालण्याचे काम सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय अन्न प्रक्रीया उद्योगमंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, 2014 पर्यंत अनेक फुड पार्क उभारले गेले. पंरतु ते कार्यान्वित होऊ शकले नाही.

2014 नंतर मात्र  अन्न प्रक्रिया उद्योगताच्या प्रगतीसाठी कागदावरच उरलेल्या अनेक योजनांना गती प्राप्तकरुन देण्यात आली आहे. सरकार सबसिडीच्या माध्यमातून या सेक्टरला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करत आहे. मेगा फुड पार्कर्सच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक शेतकर्‍यांना या फुड पार्कचा फायदा मिळेल. शेतीमालाच्या मुल्यवर्धनासाठी हा फुड पार्क मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरेल. याठिकाणी युनिट सुरू करणार्‍यांना केंद्र सरकारच्या संपदा योजनेंतर्गत सवलतदेखील मिळणार आहे. 

शरद पवार म्हणाले, मोठ्या जिल्ह्यांंमध्ये दोन-दोन आणि तालुका पातळीवर एक याप्रमाणे फुड पार्कर्स उभारले गेले पाहिजेत. सातारा मध्यवर्ती ठिकाण असल्याने सातार्‍याच्या आसपास उत्पादित होत असलेल्या अमसूल, हळद, स्ट्रॉबेरी आदी उत्पदकांना याचा थेट फायदा पोहचेल. केंद्र आणि राज्य सरकारने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याच्या धोरणामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक जीवनस्तर उंचावेल. हणमंतराव गायकवाड  म्हणाले, एकाचवेळी शेतकरी आणि ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा मेगा फूड पार्क म्हणजे 140 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला एक भव्य प्रकल्प आहे.

याद्वारे शेतीमालावर प्रक्रिया करून तो निर्यात किंवा देशांतर्गत बाजारपेठेत त्याची विक्री करणे शक्य होणार आहे. यासाठी तीन हजार टनांचे कोल्ड स्टोअरेज तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर रॉ मटेरिअल स्टोअरेज, पल्पिंग लाईन, पॅकेजिंग लाईन, एपटीपी, डब्ल्यूटीपी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सुएल ट्रिटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आले असून याचा थेट लाभ छोट्या उद्योजकांना घेता येणार आहे. साधन सामग्रीअभावी अनेकांना आपली उद्योगवृद्धी करता येत नाही, हे लक्षात घेऊन या मेगा फूड पार्कच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणार्‍या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

24 तास वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी पर्यावरणाला प्राधान्य देण्यात आले असून यातील प्रत्येक घटकाचा पुनर्वापर (रियूज) आणि पुनर्निमिती (रिसायकल) यासाठी झिरो डिस्चार्ज प्लॅन्ट तयार करण्यात आले आहेत. उमेश माने म्हणाले, शेती मालाच्या भावाविषयी शेतकर्‍यांना असणारी अनियमितता लक्षात घेता, प्रक्रीया उद्योगाच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे सातारासह आजूबाजूच्या पाच जिल्ह्यातील शेतकरीबांधवासह आणि लघू उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. मेगा फुड पार्कच्या माध्यमातून येत्या दीड ते दोन वर्षात सर्व प्रकारची आंतर राष्ट्रीय दर्जाप्राप्त उत्पादनांची निर्मिती करुन ती बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्यात येईल. 

यावेळी  श्रीमती सितामाई गायकवाड, सौ. वैशाली हणमंत गायकवाड, सौ. मोहिनी उमेश माने, डॉ. दत्तात्रय  गायकवाड,   जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,  विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील,   जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आजीमाजी आमदार, जिल्ह्यातील बहुसंख्य  नगरपालिका व नगरपंचायत समितीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पं. स. सभापती-उपसभापती, विविध राजकीय  पक्षांचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते.