होमपेज › Satara › अधिकार्‍यांकडून चुकीच्या पद्धतीने बिल्डरला मदत

अधिकार्‍यांकडून चुकीच्या पद्धतीने बिल्डरला मदत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

यादोगोपाळ पेठ तसेच सोमवार पेठेतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिलेल्या पत्राचा आधार घेवून पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी नवाकोरा रस्ता खणून चक्‍क एका बिल्डरने बांधलेल्या अपार्टमेंटला नळकनेक्शन दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर  भाजपा नगरसेवकांनी नगराध्यक्षांची भेट घेवून याबाबत तक्रार केली.  सोमवार पेठ तसेच योदोगोपाळ पेठेतील नागरी समस्यांकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याने धनंजय जांभळे तसेच भाजपच्या इतर नगरसेवकांनी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांची भेट घेवून तक्रार केली. धनंजय जांभळे म्हणाले, आरोग्य विभागाच्या बिगारी कर्मचार्‍यांना तीन ते चार महिन्यांचा पगार दिलेला नाही.

त्यातच हे बिगारी कमी केल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय प्रभागात स्वच्छतेची कामे होत नाहीत. गटारे तुंबली असून रस्त्यांवर अस्वच्छता पसरली आहे. आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. पदाधिकार्‍यांसह संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना याबाबत सूचना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. सोमवार पेठ, यादोगोपाळ पेठेत पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्याठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी पत्र दिले.

मात्र त्याचाच आधार घेवून अधिकार्‍यांनी चक्‍क बिल्डरचाच फायदा करुन दिला. याबाबत जांभळे यांनी हा प्रकार चुकीचा असल्याची बाब नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जाते. मात्र, त्याठिकाणी काढलेले चर नीट मुजवले जात नाहीत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून बांधकाम विभागाने तातडीने खड्डे मुजवण्याची गरज आहे.  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी तक्रारींची दखल घेवून संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या.
 

 

 

tags : Satara,news, Builder,apartment, taps, connection,


  •