Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Satara › खंडण्या गोळा करण्यापेक्षा खेळाडू घडवा

खंडण्या गोळा करण्यापेक्षा खेळाडू घडवा

Published On: Mar 04 2018 1:39AM | Last Updated: Mar 03 2018 11:21PMसातारा : प्रतिनिधी

पाणी, वीज, रस्ते याबरोबर औद्यागिक शांतता असेल तर कोणत्याही ठिकाणी औद्योगिकीकरण वाढते. राजकीय दूरदृष्टी असेल तर हे शक्य होते. नव्या इंडस्ट्रीज आणण्यापूर्वी आहेत, त्या टिकवणे महत्वाचे आहे. सातार्‍यात सर्वप्रथम इंडस्ट्री सुरु झाल्या पण त्याचे पुढे काय झाले, यावर खरंतर बोललंच पाहिजे. कारखानदारांकडून खंडण्या वसूल करण्यापेक्षा खेळात तरबेज असणारे खेळाडू घडवा, असे आवाहन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सातारा भूषण व उद्योग भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात ना. रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. कार्यक्रमास आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जि.प. कृषी सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवाध्यक्ष तेजस शिंदे, संतोष शेडगे  प्रमुख उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, राज्यात मुंबई तसेच पुणे परिसरात औद्योगिकीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे भविष्यात पुणे-सातारा-कॉरिडॉरला महत्व येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात इंडस्ट्रीज आणली. कमिन्सच्या आठ कंपन्या आणल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने  नुकताच मॅग्‍नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेतला. देशातील प्रत्येक राज्य औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न करत आहे. कोल्हापूरहून सातार्‍याच्या दिशेने पंचतारांकित वसाहती येत आहेत. कारखानदारी निर्माण करण्यासाठी एमआयडीसीचीच जागा असली पाहिजे असे नाही. परिघाबाहेर जावून वाटचाल करता आली पाहिजे. तसे यश काही उद्योगपतींनी मिळवलेही आहे. 

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, चंद्रकांत दळवींनी झिरो पेडन्सीचा अनोखा  उपक्रम राज्यात राबवला. जिल्ह्यात झाकोळून गेलेली रत्ने पुरस्कारा निमिताने समोर आली. विविध क्षेत्रात यश मिळवणारे उद्योगपती, खेळाडुंनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले. चंद्रकांत दळवी यांनी झिरो पेडन्सी योजनेची माहिती दिली. दरम्यान, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रास्तविक परिजात दळवी यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.