Thu, Jun 27, 2019 01:34होमपेज › Satara › संशयितांना पोलिसांनी सोडले : अ‍ॅड. वर्षा देशपांडे

संशयितांना पोलिसांनी सोडले : अ‍ॅड. वर्षा देशपांडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गर्भपाताच्या बेकायदेशीर औषधाबाबत संशयितांना तालुका पोलिस जाणूनबुजून अटक करत नसून कारवाईवेळी संशयितांना अन्‍न व औषध विभागाने ताब्यात घेतले होते. मात्र, तालुका पोलिसांनी त्यांना सोडून दिले असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. सातार्‍यात ठिकठिकाणी गर्भपाताची औषध विक्रीचे अड्डे आहेत. दरम्यान, गर्भपात औषध विक्रीमध्ये मोठ्या साखळीचा समावेश असून तत्काळ या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 दलित महिला विकास मंडळ अंतर्गत लेक लाडकी अभियानाच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे पुढे म्हणाल्या, सातारा तालुका पोलिस ठाण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बेकायदा गर्भपात औषधांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अन्‍न व औषध विभागाने कारवाई केल्यानंतर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल न करता टाळाटाळ केली.

पोलिसांनी केलेले हे कृत्य गंभीर असून संशयितांना अन्‍न व औषध विभागाने ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नाही. यामुळे दरम्यानच्या काळात संशयितांनी पुरावे नष्ट करण्याचा निश्‍चित प्रयत्न केला असण्याची शक्यता असल्याचा आरोप अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, हिरापूरमध्ये ज्या ठिकाणी बेकायदा गर्भपात करण्याची औषधे सापडली आहेत तशीच ठिकाणी सातार्‍यातील मंगळवार तळे, शाहूपुरी या परिसरात असून अशी ठिकाणी तत्काळ सील करावीत. या प्रकरणामध्ये सातार्‍यातील अनेक डॉक्टर या पध्दतीच्या औषधाच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीमध्ये गुंतले असण्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, सातारा तालुका पोलिस ठाणे हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळण्याची शक्यता नसल्याने या घटनेचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्यासह समन्वय साधून वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्याचे उल्‍लंघन झाले आहे का? याबाबत त्वरित आशा वर्कर मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
 


  •