Tue, Nov 20, 2018 21:07होमपेज › Satara › सातार्‍याचा एटीसी सेल अ‍ॅक्टिव्हेट होणार?

सातार्‍याचा एटीसी सेल अ‍ॅक्टिव्हेट होणार?

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:30PMसातारा : प्रतिनिधी
मुंबई- नालासोपारा येथे दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) बॉम्ब सदृश वस्तू जप्त केल्यानंतर त्याची लिंक सातारा शहरापर्यंत आल्याने अनेक चर्चेचे हादरे सुरू झाले आहेत. सातार्‍यातील युवकाचे असे कनेक्शन समोर आल्याने सातारा पोलीस दलाच्या ‘इंटेलिजन्स नेटवर्क’चा बोर्‍या उडाला असल्याचे स्पष्ट आहे. या कारवाईमुळे सातार्‍याचा एटीसी सेल अ‍ॅक्टिव्हेट होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. 

नालासोपारा येथे सनातनचा साधन वैभव राऊत याच्या घरातून बॉम्ब सदृश वस्तू जप्‍त केल्या. या कटाचे लागेबांधे सातार्‍यापर्यंत असल्याचे सुधन्वा गोंधळेकर याच्या अटकेनंतर समजले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सातार्‍यातील युवकाचे असे कनेक्शन समोर आल्याने सातारा पोलीस दलाचे ‘इंटेलिजन्स नेटवर्क’ किती कुचकामी झाले आहे याची प्र्रचिती येते. 

सातारा शहरासह जिल्ह्यात तीन ठिकाणी अँटी टेरिरिस्ट सेल कार्यरत आहेत. या सेलमधून दहशतवाद विरोधी कारवाया करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जातात. मात्र, सातार्‍याचा एटीसी सेल कदाचित कुंभकर्णाच्या झोपेत गेला आहे. त्यामुळेच सुधन्वा गोंधळेकर याच्यासारख्या तरूणाने हे कृत्य करण्याचे धाडस दाखवले. नालासोपाराच्या या घटनेमुळे दहशतविरोधी सेल, इंटेलिजन्स नेटवर्क आणि गोपनीय विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी नक्‍की करता तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

सातार्‍यातही विविध हिंदूत्ववादी संघटनांचे मोठे वलय आहे. त्यामुळे त्या त्या संघटनेमध्ये कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. धर्माच्या रक्षणासाठी अशा संघटनांकडून अनेकवेळी चुकीची पावले उचलली गेली आहे. यामध्ये सनातन संस्थेचे अनेक साधक हे खून प्रकरण व बॉम्बस्फोटात सापडले आहेत. त्या दृष्टीने अँटी टेरिरिस्ट सेलकडून बारीक लक्ष ठेवून संबधित कार्यकर्त्यांवर वॉच ठेवला जातो. यामध्ये इंटेलिजन्स नेटवर्क व गोपनीय विभागातील पोलिसांचे कामही महत्वाचे आहे. परंतु, अँटी टेरेरिस्ट सेलकडून फक्‍त प्रात्यक्षिकेच केली जात असल्याने एवढा गंभीर प्रकार समोर आला तरी  स्थानिक यंत्रणेला त्याचा पत्ता नव्हता याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

जिल्ह्यातील एटीसीची एसपी हजेरी घेणार का?

सातारा जिल्ह्यात सातारा शहर पोलिस स्टेशन, कराड शहर पोलिस स्टेशन व फलटण शहर पोलिस स्टेशन येथे अँटी टेरेरिस्ट सेलची निर्मिती केली आहे. गेली 6 ते 7 वर्षे या सेलची निर्मिती झाली असताना गेल्या काही वर्षांपासून या विभागाला मरगळ आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर या विभागाने सतर्क राहणे गरजेचे होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सातारा जिल्ह्याचे वेगवेगळ्या कारणाने नाव चर्चेत आले आहे. पुणे येथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्या बॉम्बस्फोटासाठी सातारा पोलिस दलातील एका पोलिसाचीच दुचाकीचा वापर करण्यात आला आहे. अशातच नालासोपारा हे कनेक्शन सातारशी संबंधित असल्याने पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आता जिल्ह्यातील एटीसी सेलची हजेरी घेणार का? गेल्या 4 वर्षांत जिल्ह्यातील तिन्ही एटीसी सेलने किती व कोेणत्या कारवाया केल्या? याचाही आढावा पोलिस अधीक्षकांनी घेणे गरजेचे आहे.

एटीसीच्या विशेष कामगिरीबद्दल प्रश्‍नचिन्ह

2011 साली एटीसी सेलची निर्मिती करण्यात आली आहे. सातारा पोलिस मुख्यालयाशेजारीच या सेलचा विभाग आहे. गेल्या 7 वर्षांत सुरूवातीच्या काळात या विभागाकडून तुरळक प्रमाणात चांगल्या कारवाया झाल्या आहेत. पोनि राजेंद्र जोशी कार्यरत असताना त्यांचे या विभागावर विशेष लक्ष होते. सातारा एटीसी सेलने ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबधित असणार्‍या एकाला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळेच 25 हजार रूपयांचे रिवार्डही देण्यत आले होते. यानंतर अशी कारवाई झाल्याचे दिसत नाही.