Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Satara › सातारा ऽ४०अंश

सातारा ऽ४०अंश

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 10:20PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. सातारकरांना उन्हाच्या तीव्र झळा, गरम वार्‍याचेे झोत आणि घामांच्या धारांचा सामना करावा लागत असून उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. मंगळवारी सातार्‍याचे कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस, तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्‍या महाबळेश्‍वरचे कमाल तापमान 35.6  अंश सेल्सिअस नोंदले गेले.

सातारा जिल्ह्यात मार्चपासूनच तापमानात चढ-उतार होत चालला आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच कडक ऊन जाणवत असल्याने सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदले जात आहे. गरम वार्‍याचेे झोत आणि घामांच्या धारांचा सामना नागरिकांना करावा  लागत आहे. उलट, पारा चढताच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.     

तीव्र उन्हामुळे  सातारा शहरासह जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. असह्य उन्हामुळे नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. सूर्य आग ओकू लागला असल्याने सकाळी 9 वाजल्यापासूनच शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांबरोबर नागरिकांची वर्दळ कमी होताना दिसत आहे.त्यामुळे अघोषित संचारबंदी लागू झाल्यासारखे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.कडक उन्हाचा तडाखा बसत असल्याने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.लहान मुले व वृध्द नागरिक  कडक उन्हामुळे व उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.तीव्र उष्म्यामुळे घटकाभर पंखा व कुलर लावावा म्हटलं तरी  विजेच्या लपंडावामुळे तेही करता येत नाही.यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

मंगळवारी सातारचे कमाल तापमान 40.1 व किमान 20.9   अंशावर होते  तर महाबळेश्‍वरचे कमाल  तापमान 35.6  तर किमान20.1 अंश सेल्सिअसवर होते. सोमवारच्या कमाल तापमानापेक्षा  सातारा व महाबळेश्‍वरच्या तापमानात 1 अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णतेची जिल्ह्यात लाटच निर्माण झाली आहे.

उन्हामुळे रूग्ण वाढले
उन्हाचा पारा वाढल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. कडक उन्हामुळे चक्कर येणे, शरीरातील पाणी कमी होणे, पोट फुगणे अशा प्रकारचे आजार बळावू लागलेे आहेत. त्यामुळे दवाखान्यातही रूग्णांची संख्या  वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे शेत शिवारात चिटपाखरू दिसेनासे झाले आहे. शेतकरी शेतातील कामे सकाळी व सायंकाळनंतर करताना दिसत आहेत.