Tue, Apr 23, 2019 01:53होमपेज › Satara › प्रतिपंढरपूर कराडचे संतसखू समाधी मंदिर

प्रतिपंढरपूर कराडचे संतसखू समाधी मंदिर

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 9:20PMकराड : प्रतिभा राजे

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भक्ती आणि परमार्थाची शिकवण या संतांनी आपल्या कार्यातून जनमानसात पोहोचवली. त्यातूनच आपल्या संस्कृतीचा, अध्यात्मिक पाया भक्कम होण्यास मदत झाली. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम या संतांंच्या मंदियाळीतील एक महत्वाचे नाव म्हणजे कराडची संत सखू. स्त्री संतांच्या परंपरेतील हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहे. सुमारे 300 वर्षापूर्वी घराची चौकट पार करण्याचं धाडस करणार्‍या सखूच्या भेटीसाठी स्वत: देव आला ती सखू म्हणजे कराडच्या आध्यात्मिक वैभवाचे कोंदण आहे.  

संत सखूची ईश्‍वराप्र्रती असलेला अपार भक्तीभाव आणि त्याला भेटण्याची तळमळ यामुळे स्वत: देवच तिच्या भेटीसाठी आला. तिच्या कर्तृत्वाने आणि कवित्वशक्तीने काळावर ठसा उमटला. मुक्ताबाई, जनाबाई, नागी, कान्होपात्रा, बहिणाबाई, नामदेव परिवारातील राजाई, लिंबाई, चोखामेळा परिवारातील सोयराबाई, निर्मला, विठाबाई तसेच 19 व्या शतकातील गोदाबाई किर्तने यासारख्या अनेक संत स्त्रीया होवून गेल्या.  त्या स्त्री संताच्या नामावलीत संत सखूचा उल्लेख होतो.  

शाहू महाराजांच्या कारकिर्दितील असणार्‍या या मंदिराचे कराडमध्ये कृष्णाकाठावर असणार्‍या समाधीस्थळावर सुमारे एक एकर जागा या देवस्थानच्या नावावर आहे. पूर्वी केवळ मंडप असणार्‍या या समाधीस्थळाचे कै. डॉ. मोहन कंटक यांनी जिर्णोध्दार करून मंदिर बांधले. त्यानंतर संत सखू उत्सव समितीने त्यामध्ये सुधारणा केल्या. मात्र तरीही हे पवित्र स्थळ दुर्लक्षित झाल्याने म्हणावी तशी सुधारणा न झाल्याने समितीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पंढरपूरच्या पांडुरंगाने कराडनगरीत आलेल्या या ठिकाणाचे वास्तविक पंढरपूर इतकेच महात्म्य आहे. तर पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांची दिंडी सर्वप्रथम या मंदिरात येवून दर्शन घेवूनच पुढे वाटचाल करतात.

त्यामुळे या ठिकाणाचे जिर्णोध्दार होणे गरजेचे होते. मात्र देवस्थान कमिटीला कमी मिळणारे उत्पन्न यामुळे हे शक्य होत नाही. समितीकडून याठिकाणी बंडातात्या कराडकर व सुपनेकर बोवा यांच्या प्र्रेरणेने वारकरी सांप्र्रदायाची निवासी पाठशाळा  सुरू करण्याचा विचार असून यासाठीचे प्लॅनिंग तयार आले होते.  या पाठशाळेत वारकरी भजन, किर्तन कसे करावे याचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच गोरक्षणासाठी गायींचे पालन करणे व मंदिराच्या उत्तरेस असणार्‍या शासनाच्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग तयार करणे आदींचा विचार करण्यात आला होता. कृष्णा काठावर असणार्‍या या मंदिराभोवती उगवलेली झाडी काढून त्याठिकाणी पालिकेकडून बाग होणे अपेक्षित आहे. समितीकडून या मंदिर व समाधीस्थळाचा जिर्णोध्दार व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शासनाकडे असणार्‍या प्राचीन मंदिराच्या तरतूदीमधून या मंदिराचा जिर्णोध्दार होण्याची गरज आहे. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

कराडच्या लोकप्र्रतिनिधींनी लक्ष देवून या मंदिराचा जिर्णोध्दार करावा. वारकरी दिंड्यांसाठी धर्मशाळा बांधाव्यात, गोरक्षणासाठी तरतूद करावी, ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यसाठी बागेची व्यवस्था, वारकरी सांप्रदायसाठी निवासी पाठशाळा होणे आवश्यक आहे. शासकीय तरतूदीतून जिर्णोध्दार झाल्यास विठ्ठलाच्या संत सखूचे मंदिर पाहण्यासाठी दूरचे पर्यटकही येवू शकतील.