Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Satara › सातार्‍यात सांगलीची वृद्धा ठार

सातार्‍यात सांगलीची वृद्धा ठार

Published On: Jul 09 2018 1:07AM | Last Updated: Jul 08 2018 11:51PMसातारा : प्रतिनिधी

सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये रविवारी दुपारी एस.टी.च्या चाकाखाली सापडून शकुंतला गणपती जंगम (वय 65,  सोनई बंगला, त्रिमूर्ती हौ. सोसा. गुलमोहर कॉलनी, जि. सांगली) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. एस.टी.ची धडक बसत असताना बचावासाठी महिला ओरडली. मात्र, क्षणात अंगावर चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी, शकुंतला जंगम या रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगली-सातारा (क्र. एमएच 14 बीटी 3270) यामधून खाली उतरल्या. एसटीतून उतल्यानंतर त्याच एसटी समोरुन जात असताना अचानक चालकाने एसटी सुरु केली व पुढे घेतली असता शकुंतला जंगम एसटीच्या पुढील चाकाखाली आल्या. एसटीचा धक्‍का लागल्यानंतर शकुंतला गडबडल्या बचावासाठी त्या ओरडल्या मात्र दुसर्‍याच क्षणाला त्या खाली पडल्या व एसटीचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले व त्या जागीच ठार झाल्या.

वृध्द महिला एसटीच्या चाकाखाली जात असताना परिसरातील इतर प्रवाशांनी ही घटना डोळ्यांदेखत पाहिली. मात्र, मदतीसाठी जाण्याअगोदरच अंगावरुन चाक गेल्याने वृध्दा ठार झाली होती. या अपघातानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. अपघातामुळे जमावामध्ये संतापाची लाट उसळली होती. पोलिस चौकीतील पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांनी रुग्णावाहिका बोलावून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिस ठाण्याला माहिती देवून त्या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. कारण वृध्द महिला एकटीच होती. पोलिसांना घटनास्थळी मृत महिलेची बॅग मिळाल्यानंतर त्यांनी त्याची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांच्या नावाची एक पावती मिळाली. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुमारे एक तासानंतर त्या महिलेचे नाव शकुंतला जंगम असल्याचे समोर आले. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून कुटुंबियांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जंगम कुटुंबिय व नातेवाईकांनी सातार्‍याकडे धाव घेतली.