Wed, Apr 24, 2019 11:34होमपेज › Satara › लाचप्रकरणी सांगली पोलिसाला अटक

लाचप्रकरणी सांगली पोलिसाला अटक

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:47PMसातारा : प्रतिनिधी

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सकाळी सांगली जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदार अझरुद्दीन पिरजादे याला 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली. पिरजादे हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा (एलसीबी) कर्मचारी आहेे. दरम्यान, सातारा एसीबीने सांगली एलसीबीच्या कर्मचार्‍यावर ‘ट्रॅप’ लावून कारवाई केल्याने सातारा, सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अझरुद्दीन पिरजादे हा सध्या सांगली एलसीबीमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे वाळू व्यावसायिक आहेत. त्यांना संशयित अझरुद्दीन पिरजादे याने वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येवून तक्रार दिली.

सातारा एसीबीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्‍ला यांनी तक्रारदाराचा अर्ज वाचून कार्यवाहीला सुरुवात केली. सातारा एसीबीने पडताळणी केली असता संशयित अझरुद्दीन पिरजादे याने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. काही काळ थांबल्यानंतर मात्र पिरजादे याने पैसे स्वीकारले नाहीत. पैसे स्वीकारत नसल्याने अखेर सातारा एसीबीने सोमवारी सकाळी सांगलीत जावून अझरुद्दीन पिरजादे याला ताब्यात घेतले. सांगली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द लाचेचा गुन्हा दाखल करुन पिरजादे याला अटक केली. ही कारवाई पोनि आरिफा मुल्‍ला यांच्या पथकाने केली आहे.

सातारा एसीबीचा सांगली पोलिसावर ट्रॅप झाला असल्याचे समोर आल्यानंतर सांगलीसह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात, लोकप्रतिनिधी यांनी लाचेची मागणी केली तर 1064 या टोल फ्री किंवा जिल्हा न्यायालयासमोरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.