Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Satara › संदीप मोझर राजकारणापासून अलिप्‍त

संदीप मोझर राजकारणापासून अलिप्‍त

Published On: Mar 04 2018 1:39AM | Last Updated: Mar 03 2018 11:35PMसातारा : प्रतिनिधी

मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी अचानक सक्रिय राजकारणापासून अलिप्‍त राहण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. व्यक्‍तिगतरीत्या स्वत: राजकारणातून दूर होत असलो तरी पक्षातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांवर कायम राहून राजकीय प्रवाहात रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

संदीप मोझर हे मनसेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नुकताच त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत  मनसेच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा सातार्‍यात यशस्वी केला होता. यावेळी राज ठाकरे यांनीही संदीप मोझर यांच्या कार्याचा गौरव केला होता. असे असताना शनिवारी अचानक संदीप मोझर यांनी राजकारणापासून अलिप्‍त राहण्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

याबाबत संदीप मोझर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाविद्यालयीन जीवनापासून मी समाजकार्यात सक्रिय आहे. समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या घरदार, शेतीवाडीचा त्याग करुन धोम प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या पूर्वजांनी त्यागाचा वारसा घालून दिला आहे. त्याच परंपरेचे पाईक म्हणून मी राजकारण, समाजकारणात सक्रिय झालो. खोट्या गुन्ह्यात अडकवून मला कारावासही भोगावा लागला.

मात्र, तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे राज्य उपाध्यक्षपद आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रमुख संघटकपदही बहाल केले. पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान केले. पक्षनेतृत्वानेही माझ्यावर विश्वास दाखवून माझी नेहमीच पाठराखण केली. राज ठाकरे कार्यक्रमाच्या निमित्ताने सातार्‍यात आल्यावर माझ्या निवासस्थानीही आले होते. माझ्या शब्दाखातर अनेक कार्यकर्त्यांना पक्षातील जबाबदारीची पदे दिली. त्यांच्या या विश्वासाबद्दल मी त्यांचा कृतज्ञ राहिन. मात्र, माझ्या व्यावसायिक भरारीसाठी आणि कुटुंबास पुरेसा वेळ देण्यासाठी सक्रिय राजकारणापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेत आहे.

मी पक्ष सोडत असलो तरी, अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही किंवा कोणतीही संघटना स्थापून त्याद्वारे राजकारण करणार नाही. मात्र, माझ्यावर विश्वास दाखवून सुरु झालेली विविध आंदोलने तडीस नेण्यासाठी तसूभरही मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले. 

कोणताही पक्ष, संघटनेत सक्रिय होणार नाही 

पक्षात प्रवेश करतानाच ‘मनसे’ हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल ही घोषणा सत्यात आणत, यापुढे कोणताही राजकीय पक्ष, संघटना यामध्ये सक्रिय न होता व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष देऊन त्या बरोबरीने समाजसेवेचे व्रत जोपासणार आहे. भविष्यात स्वत: कोणतीही निवडणूक लढवणार नसलो आणि आपण स्वत: पक्षीय राजकारणातून दूर होत असलो तरी आपणावर विश्‍वास ठेवून ‘मनसे’त आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांनी आपापल्या पदांवर कायम राहून राजकारण, समाजकारणात सक्रिय रहावे. माझ्या पाठोपाठ कोणीही पक्षाचा व पक्षातील पदांंचा त्याग करू नये, असे आवाहनही संदीप मोझर यांनी केले.