Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Satara › मुख्यमंत्र्यांनी दिली एस.पी. संदीप पाटील यांना शाबासकी

मुख्यमंत्र्यांनी दिली एस.पी. संदीप पाटील यांना शाबासकी

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 11:10PMसातारा : प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी राबवलेली स्मार्ट पोलिसींग योजना व गडचिरोली येथे पाठवलेल्या 7 हजार पुस्तकांच्या मोहिमेची विशेष दखल घेतली असून त्यांनी 3 ट्विट करुन संदीप पाटील यांंच्या कार्यपध्दतीचा एकप्रकारे अनोखा गौरव केला आहे. स्मार्ट पोलिसींगच्या प्रशस्तीपत्रकामुळे सातारा पोलिस दलातील अधिकार्‍यांमध्ये उर्जा निर्माण झाली असून त्यांचे मनोबलही उंचावले आहे.

संदीप पाटील यांनी पावणेदोन वर्षापूर्वी सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाची सुत्रे हाती घेतली. सातारामध्ये रुजू होताच त्यांनी ‘बुके नको पुस्तके भेट द्या’, असे आवाहन केले होते. सातारकरांनीही या अभिनव योजनेला साद देत बुके देण्याऐवजी पुस्तकांची भेट दिली. त्यामुळे पावणेदोन वर्षात 7 हजार पुस्तके जमा झाली असून सुमारे 1 हजार 500 वह्याही जमा झाल्या आहेत. यातील वह्या सातारामध्येच ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुस्तके जमा झाल्यानंतर ‘ज्ञानाच्या शिदोरी’ची ही व्हॅन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून गडाचिरोलीकडे रवाना करण्यात आली.

एसपी संदीप पाटील यांनी सातार्‍यात राबवलेल्या या मोहिमेचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन कौतुक केले. शनिवारी ते सातारा दौर्‍यावर आल्यानंतर जाहीररित्या कार्यक्रमातच एसपी संदीप पाटील यांच्याशी ते स्वत:हून बोलले. ‘संदीप पाटील यांनीही स्वत: गडचिरोली जिल्ह्याची पोस्टींग मागून घेतली. गडचिरोलीतील त्यांचे काम अविस्मरणीय राहिले आहे. नक्षलवाद्यांशी लढा उभारत असताना तेथे लोकशाहीची बिजे रुजवणे व नक्षलवाद्यांचे प्रत्यार्पण करणे अशी अवघड भूमिका त्यांनी बजावली आहे. सर्वाधिक नक्षलवाद्यांचा खात्माही त्यांच्याच कालावधीमध्ये झाल्याने नक्षलवाद्यांनी त्यांचा धसका घेतला होता.

गडचिरोली येथील यशस्वी कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते सातारा येथे आले. गडचिरोलीतील परिस्थिती व सातार्‍यातील परिस्थिती अतिशय वेगळी आहे. गडचिरोलीमध्ये केलेल्या ठळक कामाप्रमाणेच त्यांनी सातार्‍यातही तसेच काम पुढे सुरु ठेवले आहे. पोलिस अधिकारी म्हणून संदीप पाटील हे स्मार्ट आहेत. स्मार्ट पोलिसींग संकल्पना अत्यंत कठीण असतानाही सातार्‍यातील सर्व पोलिस ठाणी व पोलिस मुख्यालय आयएसओ करुन त्यांनी मैलाची कामगिरी केली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीमुळेच सातारा पोलिस दलाचे नाव देशात झाले असल्याचे गौरवोद‍्गार काढले.

सातार्‍यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कामगिरीवर भरभरुन बोलले. त्यावेळी अख्खे पोलिस दल टाळ्या वाजवून त्याला दाद देत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरही सातारा पोलिस दलाचे कौतुक केले. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तीन ट्विट करुन सातारा पोलिसांना एक प्रकारे शाबासकीच दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सातारा पोलिसांच्या कामगिरीबाबत केलेले ट्वीट....

मुख्यमंत्र्यांनी सातारा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याबाबत एकूण तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सातारचे एसपी संदीप पाटील यांची गडचिरोली येथून सातारा येथे बदली झाल्यानंतर मला भेटायला येताना बुके आणण्याऐवजी बुक आणा, असे आवाहन केले. त्यानुसार 4000 हजार पुस्तके जमा झाली असून ती गडचिरोली येथील विविध ग्रंथालयांमध्ये वाचण्यासाठी ठेवली जाणार आहेत.’ 

दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘स्मार्ट पोलिसींग म्हणजे सर्व प्राथमिक सुविधा, जबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्ग, सीसीटीएनएस, इंटरनेटची सुविधा, लोकांनी मनमोकळेपणाने पोलिस ठाण्याला जाणे, वेळच्या वेळी सर्व ट्रेनिंग, आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद, गंभीरता, तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करणे होय.’  या ट्विटमध्ये ना. फडणवीस यांनी सातारा पोलिसांच्या विविध उपक्रमांची बारकाईने दखल घेतल्याचे दिसत आहे.

तिसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘स्मार्ट पोलिसींग ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहटी येथे 2014 साली जाहीर केली. सातारा येथील 37 पोलिस स्टेशन व सातारा पोलिस  मुख्यालय हे स्मार्ट बनवले गेले. यातील 14 पोलिस ठाण्यांना ए प्लस प्लस, 12 पोलिस ठाणी ए प्लस व 11 पोलिस ठाणी ए कॅटॅगीरितील आहेत,’ अशाप्रकारचे तीन ट्विट करुन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिसांचे कौतुक केले.