होमपेज › Satara › कृष्णेचे लचके  तोडले; आता उरमोडीचे...!

कृष्णेचे लचके  तोडले; आता उरमोडीचे...!

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी 

महसूल व पोलीस प्रशासनाच्यावतीने वारंवार वाळू उपस्याच्या विरोधात कठोर कारवाई करूनही वाळू चोरटे अक्षरशः कृष्णा व उरमोडी नदीपात्रातील वाळू उपसा करीत दादागिरी करताना दिसत आहेत. नागठाणे येथील  उरमोडी नदीपात्रात  वाळू उपसा सुरू झाल्याने कृष्णा नदीचे लचके तोडले आता उरमोडीचे....! अशी म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 

राजरोसपणे वाळू उपसा होत असताना महसूल विभागाचे कर्मचारी गप्प का? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे. नेहमीच वरिष्ठांच्या निदर्शनास चांगले काम करीत असतो, असा दिखाऊपणा करणार्‍या महसूल कर्मचार्‍यांनी अद्याप कारवाई का केली नाही? हे मात्र न सुटणारे कोडे होऊन बसले आहे. यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल मॅडम आता तुम्हीच लक्ष घाला...! नाहीतर हे मोकाट सुटलेले वाळू चोरटे सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या मळव्या पाडून स्वत:ची तुंबडी भरायला मागे-पुढे बघणार नाहीत. शासनाचा महसूल बुडवून वाळू उपसा करणार्‍या वाळू चोरट्यांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे. 

सातारा तालुक्यातील वेणेगाव, कोपर्डे, नांदगाव, फत्यापूर, कामेरी, मत्यापूर, काशीळ तसेच कराड तालुक्यातील कालगाव येथील कृष्णा नदीपात्रात सोयीनुसार वाळू चोरटे वाळू उपसा करताना दिसत आहेत. उरमोडी नदीपात्र वाळू उपस्याला अपवाद होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून नागठाणे हद्दीत चोरट्यांनी वाळू उपस्याला सुरूवात केली आहे. येथील मूठभर वाळूचे एजंट म्हणून मिरवणार्‍या स्वयंघोषित  कार्यकर्त्यांना अमिष देत वाळू सम्राटांनी अक्षरशः उरमोडीत धुमाकूळ घातला आहे. कोणत्याही परिस्थितीत महसूल विभागात तक्रार करू नये, ग्रामस्थांना देणगी स्वरूपात रक्कम देण्याचे आश्‍वासन देऊन नदी आमच्या बापाची, असा आविर्भाव वाळू चोरट्यांचा पहावयास मिळत आहे.  

गेल्या कित्येक दिवसांपासून सातारा तालुक्यातील वेणेगाव, कोपर्डे, कामेरी, फत्यापूर, काशीळ, मत्यापूर तसेच कराड तालुक्यातील कालगाव, पेरले हद्दीत सोयीनुसार वाळू उपसा केला जात असताना महसूल तसेच पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, महसूल विभागाच्या जुजबी कारवाईमुळे वाळू चोरट्यांचा फाजील आत्मविश्‍वास वाढला आहे. कालगाव येथील कृष्णा नदी पात्रात बेसुमार वाळू उपस्यावर महसूल विभागाच्यावतीने कोणतेच जालीम औषध न मिळाल्याने काही युवा कार्यकर्त्यांना वाळू उपसा करून उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांची भीती दाखवत तर महसूल विभागाचा कर्मचारी लाचलुचपत खात्यांतर्गंत पकडून देऊन महसूल विभागावर दादागिरी करीत वाळू उपसा करताना काही वाळू चोरटे दिसत आहेत. 

उरमोडीतील वाळू चोरीबाबत ठोस उपाययोजना न केल्यास गौणखनिज विभागाचा महसूल पाण्यात जाणार आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. ‘कृष्णेचे लचके तोडले आता उरमोडीचे.......! कोण रोखणार नागठाणे व अपशिंगे (मि.) मंडलातील वाळू चोरी? असा यक्ष प्रश्‍न या परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.