Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › Satara › सातार्‍यात लहान बाळाची विक्री

सातार्‍यात लहान बाळाची विक्री

Published On: May 16 2019 2:13AM | Last Updated: May 16 2019 2:20AM
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात कुमारी मातेने मुलाला जन्म दिल्यानंतर त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता ते बाळ बेकायदेशीररीत्या दत्तक दिल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात  पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बाळाची विक्री झाल्याचे समोर आल्याने  खळबळ उडाली असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विभागाच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

उषा दिनकर जगताप, दिनकर जगताप (दोघे रा. खावली, ता. सातारा), सौ. मंगल नामदेव तुपे, नामदेव साहेबराव तुपे (दोघे रा. विकासनगर, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रोहिणी सुरेशचंद्र ढवळे (वय 36, मूळ रा. वडगाव, शिरुर, पुणे, सध्या रा. पीरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या महिला बाल कल्याण समितीच्या अधिकारी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यात एका अल्पवयीन मुलीने मार्च 2019 मध्ये मुलाला जन्म दिला होता. मुलाचा सांभाळ करू शकत नसल्याने तसा अर्ज व नंतर पुढे ते बाळ त्या मातेने जिल्हा महिला बाल समितीकडे दिले होते. पुढे तेथून ते बाळ म्हसवड येथील शासकीय शिशूगृहात पाठवण्यात आले होते. ही सर्व प्रक्रिया 12 मार्च 2019 रोजी पार पडल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या मातेने त्या मुलाचा ताबा परत द्यावा, असा अर्ज करून त्या बाळाचा ताबा मिळवला होता. बाळाचा  परत   ताबा मिळवल्यानंतर जिल्हा महिला बाल समितीने त्या मातेला बाळासह महिन्यातून एकदा विभागात हजेरी लावण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्या मातेने मुलासह महिला बाल कल्याण समितीपुढे हजेरी लावली. मात्र त्यानंतर ती माता व बाळ बेपत्ता झाले. या घटनेचा सर्व पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अल्पवयीन मातेने ते बाळ कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता दुसर्‍याला दिले असल्याचे समोर आले. या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर अखेर बुधवारी रोहिणी ढवळे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. यातील संशयित माता अल्पवयीन असून बाळ देणारे व बाळ घेणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि पवार पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नुकत्याच जन्मलेल्या बालकाबाबत सातार्‍यात अशाप्रकारची घटना घडल्याने  संतापाची लाट  उसळली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच असे प्रकरण पाचगणी येथे घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर लगेच सातार्‍यातीलही ही घटना समोर आल्याने जिल्ह्यात यापाठीमागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पोलिस या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.