Tue, Jul 23, 2019 07:13होमपेज › Satara › मराठ्यांचा आरक्षणासाठी जागर, गोंधळ

मराठ्यांचा आरक्षणासाठी जागर, गोंधळ

Published On: Aug 09 2018 7:19PM | Last Updated: Aug 09 2018 10:50PMसातारा : प्रतिनिधी

घर तेथे घराणे आणि घराणे तेथे कुळ असतेच.  कुल तेथे कुळधर्म  किंवा कुलाचार हा पाळलाच पाहिजे, हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये ‘जागरण’  तर  देवीच्या कुलाचारातील ‘गोंधळ ’हा प्रमुख भाग आहे.  संपूर्ण महाराष्ट्राच्या या कुलदैवतांना सकल मराठा समाजाने साकडे घालून मराठा आरक्षणाचा जागर आणि गोंधळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घातला. तहान, भूक विसरुन बेभान झालेल्या समाजाने राज्यकत्यार्ंना सुबुध्दी दे, हक्‍काच्या आरक्षणाचा नवस पुरा कर, असं साकडंच जणू मराठ्यांनी आपल्या कुलदैवतांना घातलं.

जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढले. शांततेच्या मार्गाने राज्य सरकार मागण्या मान्य करत नसल्याने  जिल्हाधिकारी कार्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.  हे आंदोलन  अहिंसेच्या मार्गाने पार पाडले. इतकी वर्षे समाज आरक्षणाची मागणी करत असताना कुठल्याही राज्यकर्त्याला पाझर फुटत नसल्याने आंदोलकांनी थेट कुलदैवतांचाच धावा केला. मराठा बांधवांचे हाल, आपेष्टा, गार्‍हाणी सरकारला ऐकू येत नसल्याने जागरण, गोंधळ आणि भजन गायनाने मराठा समाजाने त्यांच्या व्यथा मांडल्या.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी समाजाला दिशा दिली. या संतांना वंदन करुन भजनाला सुरुवात झाली.  मराठा समाजाला परंपरा, एक संस्कार आहे. आरक्षणाच्या मुद्यावर ही शक्‍ती ताकद म्हणून एकवटते. या आंदोलनात सादर केलेल्या वीरगीतांनी मराठ्यांचा इतिहास उजगार करणार केला. यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतावर आंदोलका वीररसात बुडाले. त्यांनी ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती..’ या गीतावर ठेका धरला. या गीताने उपस्थितांचा हुरुप वाढवला. अंगावर रोमांच उभे करणार्‍या ‘वेडात मराठे वीर दौडवले सात,’ या गीताने आंदोलकांच्या गर्दीत चैतन्य उसळले. ‘जयोस्तुतेऽ जयोस्तुतेऽऽ श्रीमहन्मंगले शिवास्पदे’ या गीताने देशभक्‍तीची प्रेरणा जागवली. ऊन, पाऊसाची पर्वा न करता गर्दीचा ठिय्या जागचा हलला नाही. मरके भी नहीं हटता वो मराठा, याची आठवण करुन देणारे असेच हे चित्र होते. राजमाता जिजाऊंच्या शिकवणुकीवर महाराष्ट्र उभा राहिला.  तर पंढरपूरच्या विठुरायच्या चरणावर वारकर्‍यांनी स्वर्ग पाहिला. ‘लय भारी’ या चित्रपटातील ‘माऊली-माऊली’ या गीताने शक्‍ती आणि भक्‍तीचे परमोच्च शिखर गाठलं. 

संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट मोर्चे निघाले. या आंदोलनाला एक विचार असल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले. विचार चांगले असतील तर यश मिळते. तसाच विठ्ठलाचा ध्यास वारीतून वारकरी घेतात, हे सांगताना ‘रुप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी’  याची सादरकर्त्यांनी केलेली मांडणी आंदोलकांना फारच भावली. ‘खेळ मांडियेला वाळवंटीकाठी,’ ‘विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोवला’ असं आंदोलनाच आगळंवगळं नातं त्यांनी विठ्ठलभक्‍तीशी जोडलं. 

अंबामाता, भवानी, दुर्गा अशी शक्‍तिदेवतेची विविध रूपं  आहेत. या   रूपांच संकीर्तन म्हणजे गोंधळ असतो.  कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये ‘जागरण’  तर  देवीच्या कुलाचारातील ‘गोंधळ’ असतो. ‘उदे ग अंबे उदे’ म्हणत मराठ्यांनी आरक्षणासाठी गोंधळ घातला.  आली हो गोंधळाला..गोंधळाला तुळजाभवानी आई, असे म्हणत त्यांनी तुळजापुरच्या भवानीमातेलाही साकडे घातले. विचार फलद्रुप होण्यासाठी गोंधळाची गरज असते हे स्प्ष्ट करत ‘लल्लाटी भंडार’ हे गीतही सादर झाले.   कोणतेही कठिण कार्य सफल करण्यासाठी कुलदैवतेची उपासना करावी लागते. त्यामुळे या जागरणात जेजुरीच्या खंडेरायाचाही धावा झाला. ‘जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या या,’ अशी विनवणी जेजुरी आणि पालीच्या खंडोबाकडे आंदोलकांनी केली.   ‘जयदेवा जयदेवा शिवमार्तंडा’ ‘खंडुबाची कारभारीन.. झाली बानू धनगरीन’ या गीतांवर आंदोलक तल्‍लीन झाले. त्यांच्यातील दिवसभराचा शिनवटा पार निघून गेला.   ‘चांगभलं रं चांग भलं..देवा जोतीबा चांग भलं,’ कोल्हापूरच्या जोतीबाचाही यावेळी धावा केला.

मराठा समाजाचे वास्तव प्रखरपणे समोर आणणारे गीतही एका वृध्दाने सादर केले. ‘देरे, देरे आता तरी देरे, जवळील गेलं.. पोरं बाळ उघड्यावर पडली, उपाशी रहिली, जमत नसेल तर घरी जारे घरी जारे’ अशी मनातील खदखद या गीतातून व्यक्‍त झाली. ‘पणती समोर ठेवा.. अंधार फार झाला,’ या गीताने गर्दीतील दादा, तात्या, भाऊ, बापू सजग झाले, एक झाले.  जागर, गोंधळातील प्रत्येक गीतानंतर माळ्यांच्या गगनभेदी घोषणा गर्दीत उत्साह  आणि ऊर्जा निर्माण करत होत्या. मराठा समाजाचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. या व्यवसावरील निष्ठा  आणि प्रेम व्यक्‍त करणारी शेतकरी गीतेही सादर झाली. ‘कुर्‍या चालल्या रानात..सुरु झालीय पेरण.’ ‘झुजूमुंजू पहाट झाली.. कोंबड्यान् बाग दिली,’ ‘भलगरी दादा भलं रं’ या गीतांनी आंदोलकांना मंत्रमुग्ध केले. शेतकर्‍याच्या साध्या भोळेपणावर भाष्य करणारे ‘हे भोळ्या शंकरा’ या गीतालाही गर्दीने टाळ्यांच्या गजरात साथ दिली. 

भजन, गोंधळ आणि जागरणाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांचं गार्‍हाणं कुलदैवतांसमोरही मांडलं. आंधळ्या-बहिर्‍या सरकारला  मराठा समाजाचा टाहो ऐकू येत नसल्याने कुलदैवतांना आर्त साद घातली. अशा वेगळ्या पध्दतीने का होईना पण देवाचा केलेला पुकार हा त्याच्यापर्यंत नक्‍की पोहोचेल या भाबड्या भक्‍तीतून त्यांनी परमेश्‍वराकडे धावा केला. लिंबच्या स्वर सह्याद्री सप्‍तक निर्मिती भजनी मंडळ यांचा कार्यक्रमात सहभाग होता. जागर, गोंधळानंतर या आंदोलनात हुतात्मा झालेल्या मराठा समाजबांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीतानंतर आंदोलनाचा समारोप झाला.