Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Satara › ट्रेकर्सच महाबळेश्‍वरचे रिअल हिरो

ट्रेकर्सच महाबळेश्‍वरचे रिअल हिरो

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:41PMमहाबळेश्‍वर : प्रेषित गांधी 

प्रतिकूल परिस्थिती,पूर्ण उभी दरी, पाऊसामुळे निसरडा झालेले कडा, सुटलेले दगड, निसरडी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत महाबळेश्‍वर व सह्याद्री ट्रेकर्सने दरीतील मृतदेह बाहेर काढून मदत कार्यात आपली भूमिका योग्यपणे बजावली. साहसी वृत्ती, अनुभव व आत्मविश्वासाच्या जोरावर पुरेशी अत्याधुनिक साधनसामग्री नसताना देखील प्रसंगी जीवावर उदार होऊन केलेले कार्य कौतुका पलीकडचे आहे. त्यामुळे हे ट्रेकर्स ‘महाबळेश्‍वरचे रिअल हिरो’ असल्याचा अनुभव जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांना आला. 

दरीमध्ये खासगी बस कोसळल्याचे कळताच हा हा म्हणता ही बातमी परिसरात पसरली. पोलिस व शासकीय यंत्रणा पोहचण्याआधीच वाडा कुंभरोशी येथून सह्याद्री व महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले.  यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्ट्रॅटर्जी ठरवण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे व महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे सुनील भाटीया घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू झाले. 

ट्रेकर्सनी दोरखंडाच्या सहाय्याने दरीत वाट निर्माण करून ज्याचे पल्स लागत होते त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, गंभीर अवस्थेतील एकाने ट्रेकर्सच्यासमोरच आपले प्राण सोडले. त्यामुळे ट्रेकर्सचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. 

अजूनही काही कर्मचारी जिवंत असतील या आशेने ट्रेकर्सने आपले प्रयत्न सुरूच ठेवले मात्र या खोल दरीमधील परिस्थिती विदारक तितकीच गंभीर होती. कुणाचा भाऊ...कुणाचा काका..कुणाचा बाबा..कुणाचा मुलगा...सुवासिनीच्या कपाळावरच कुंकू...अश्या अवघ्या तिशी- चाळिशीतील तरुण निपचित पडलेले दिसले. प्रत्येक टप्प्यावर, मोठमोठ्या दगडांवर, दगडांखाली झाडांमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात विखुरलेले मृतदेह महाबळेश्वर पाहण्याचे स्वप्न घेऊन आलेले हे तीस सहकारी, मित्र मात्र काळाने हिरावून घेतले. 

600 फुटांच्या या खोल दरीमध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे उतरलेले सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे, नगरसेवक कुमार शिंदे, किरण चव्हाण, अमित कोळी,  सुनील जाधव तर सह्याद्रि ट्रेकर्सचे जयवंत बिरामणे, निलेश बावळेकर, सनी बावळेकर, प्रवीण देशमुख, अनिल लांगी, राहुल तपासे, दुर्वास पाटसुते, संजय भोसले, सुनील जाधव, अक्षय शेलार, वैभव जानकर, विजय केळघरे, दीपक जाधव, किरण जाधव, धोंडीराम शेलार, आकाश शेलार, जयवंत बिरामणे, प्रवीण देशमुख, सुनील केळगणे, ओंकार नवीलकर, प्रमोद कात्रट, अक्षय माने, जयवंत जांभळे, सुनील वाडकर, संदीप जांभळे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी एक एक मृतदेह बाहेर काढण्यास सुरूवात केली. मृतदेह काढताना कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी महाबळेश्वर कडून पोलादपूर व पोलादपूर कडून महाबळेश्वर ला येणारी वाहतूक बंद करण्यात आली.

दुपारी महाड येथून आलेल्या क्रेन व विविध संघटनांच्या साथीने मदतकार्यात वेग आला. जसजसा अंधार होत होता तसतसा मदतकार्यात अडथळे येत होते सात आठ तासांहून अधिक काळ ट्रेकर्सचे जवान या बचाव कार्यात सक्रिय होते. यांनतर सायंकाळी पुण्याच्या एनडीआरफचे जवान आले. रात्री 12 वाजता एक मृतदेह बाहेर काढून काम थांबवण्यात आले. त्यानंतर पुन्हा सकाळी 6 वाजता मदत कार्य सुरू केल्यानंतर 11.30 वाजता शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मदत कार्यात महाबळेश्वर ट्रेकर्सचे 35 तर सहयाद्री ट्रेकर्सचे 30 जवान  सहभागी होते. यांच्यासह पोनि दत्तात्रय नाळे, तहसीलदार रमेश शेंडगे यांनीही महत्वाची भूमिका बजावली.  

या बचाव कार्यात अनेक अडथळे आले. काही ट्रेकर्सना जखमा झाल्या या जखमांची फिकर न करता आपली भूमिका चोख बजावणार्‍या या जवानांनी या आधी देखील महाराष्ट्रभरात अनेक अपघातांमध्ये शेकडो जीव वाचविले आहेत.  तर अवघड जागी जेथे जाऊच शकत नाही अश्या ठिकाणी कर्र अंधारात कोठेही, कधीही, कोणतीही घटना झाली की, दोन्ही ट्रेकर्सचे कार्यकर्ते उपलब्ध असतात. दरम्यान, या घटनेत दोन्ही ट्रेकर्सकडे अत्याधुनिक साहित्याची कमतरता असल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोन्ही ट्रेकर्सना शासन स्तरावरून मदत होणे गरजेचे आहे. तसेच दानशूरांनीही ट्रेकर्सला लागणारे साहित्य पुरवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.