Thu, Aug 22, 2019 10:31होमपेज › Satara › ‘सह्याद्री’ ऊस गाळपात राज्यात तिसरा

‘सह्याद्री’ ऊस गाळपात राज्यात तिसरा

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 11:07PMकराड : प्रतिनिधी    

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन 2017-18 गळीत हंगामात काटेकोर नियोजन करीत प्रतिदिन 8200 मे.टनाचेवर म्हणजेच दैनंदिन गाळप क्षमतेहून अधिक ऊस गाळप करून, कारखान्याने 14 लाख 44 हजार 117 मे. टन एवढ्या ऊसाचे गाळप केले आहे. त्यापासून 18 लाख 06 हजार 210 क्‍विंटल साखरेचे उत्पादन करत सरासरी साखर उतारा 12.36 टक्के मिळाला आहे. सह्याद्रिचे ऊस गाळप व साखर उत्पादन जिल्ह्यात नंबर एकचे व राज्यात तिसर्‍या क्रमांकाचे आहे.

चालू सन 2017-18 ऊस गाळप हंगामाच्या सुरूवातीस खुल्या बाजारात साखरेचे भाव क्‍विंटलला 3400 रूपयांचे दरम्यान होते. साखरेच्या या दराचा विचार करून शेतकर्‍यांनी हंगामातील ऊसाच्या पहिल्या हप्त्यापोटी टनाला 3200 रूपये  प्रमाणे मागणी केली व तसा पहिल्या उचलीचा दर देण्यासाठी आंदोलन केले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगामाची एफ.आर.पी अधिक 200 रूपये  पहिली उचल देण्याचा निर्णय जाहीर केला. परंतू पुढे साखरेच्या दरात क्‍विंटलला रूपये 2500 रूपयापर्यंत घसरण झाली. परिणामी साखरेच्या तारणावर उचल देण्यास बँकांनीही वेळोवेळी कपात केली.

शेवटी बँकांनी प्रती क्‍विंटल साखर पोते उचलीचा दर रूपये 2190 रूपयापर्यंत खाली आणला. त्यामुळे एफआरपी अधिक 200 रूपये दर देण्यास कारखान्यांना निधी उपलब्ध झाला नाही. म्हणून काही कारखान्यांनी प्रती टन रूपये 2200 रूपये ते प्रती टन रूपये 2500 रुपयांपर्यंत पहिल्या उचलीचा दर कमी केला. असा कमी केलेला उचलीचा दर एफआरपी पेक्षा कमी आहे. मात्र साखर माल तारण खात्यावरील उचलीचा दर कमी झाला असतानाही सातारा जिल्ह्यातील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सुरूवातीस प्रती टन ऊसास एफआरपी पेक्षा जादा 221 रुपये हा आघाडीचा ऊस दर दिला.

पुढे साखरेच्या दरातील घसरणीनंतर 1 जानेवारी 2018 पासून प्रती टनास 100 रूपयांनी उचलीचा दर कमी करून सर्व ऊसास प्रती टनास रूपये 2921 रुपयांप्रमाणे पहिली उचल दिली. सह्याद्रि कारखान्याने 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या ऊसास प्रती टन 3021 रुपये व 1 जानेवारी 2018 पासून हंगाम अखेरपर्यंतच्या सर्व ऊसास रूपये 2921 रुपये पहिली उचल दिलेली आहे. ती एफआरपी पेक्षा अनुक्रमे 221 रुपये व 121 रुपयांनी जादा आहे.  

दरम्यान बाजारातील साखरेचे उतरलेले दर पाहून काही साखर कारखान्यांनी आपले हंगाम आटोपते घेतले. मात्र सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रामधील ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत कारखाना सुरू ठेवून 14 लाख 44 हजार 117 मे.टन ऊसाचे उच्चांकी गाळप केले. हे गाळप सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे व राज्यात तिसर्‍या क्रमांकाचे आहे.