होमपेज › Satara › ‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’

‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 8:08PMवारीतील वारकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर वारीचे रुपही बदलत चालले आहे. माऊलींचा लोणंद गावामध्ये यापूर्वी मराठी शाळा, मार्केट यार्ड, रेल्वे पूल या ठिकाणी मुक्‍काम होत असे. अपुरी जागा व अडचणीमुळे मुक्‍कामाची जागा बदलावी लागली. गावाच्या मध्यभागी असलेल्या बाजार तळाला पालखी तळाचे स्वरुप देण्याचे काम तत्कालीन तहसीलदार एकनाथराव दुधाने व सरपंच आनंदराव शेळके-पाटील यांनी केले. त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे बाजारतळ या परिसराचे आता रुपच बदलून गेले आहे.

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पुण्यस्पर्शाने आणि संजीवन समाधीच्या स्थानाने पवित्र झालेल्या आळंदीच्या तीर्थक्षेत्रापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरीची पायी वारी करत असतात. आळंदी ते पंढरी ही पायी वारी करण्याची फार मोठी परंपरा आहे. शेकडो वर्षांचा धार्मिक, सामाजिक वारसा आहे. आजही तेवढ्याच उत्साहात माऊलींचा पालखी सोहळा निघतो अन् वारकरी, भाविक भक्‍तीरसात न्हाऊन निघतो. 

पंढरीच्या वारीमध्ये वारकरी, फडकरी, दिंडीकरी, ग्रामस्थ, शेतकरी, कामकरी अशा गरीब, श्रीमंत व नोकरदार मोठ्या भक्‍तीभावाने सहभागी होत असतात. माऊलींबरोबरचा प्रवास ऊन, वारा, पाऊस, पाणी सोयी-गैरसोयी यांचा विचार न करता टाळ मृदुंगाच्या साथीने भगवी पताका खांद्यावर घेऊन मुखाने अभंग गात भक्‍तीरसात रंगून जातात. पालखी किंवा वारी हा जसा एक अध्यात्मिक अविष्कार आहे तसाच तो एकात्मकतेचा विराट लोकप्रवाह आहे. अध्यात्मिक आनंदाबरोबर स्वत:च्या जीवनाला वळण देणारा तो एक संस्कार प्रवाह आहे.

ज्या गावात आपल्याला जायचे आहे ते गावच आपण व्हावे तसेच देवाच्या गावाला जावे आणि स्वत:च्या जीवनात देवाचीच अनुभूती यावी असा हा मार्ग आहे. वारकरी वैष्णवांनी हा मार्ग चोखाळला आहे. वारी ही जीवनातील निष्ठा आहे. या भूमिकेतून ते वारीची अनुभूती घेत आहेत. शुद्ध आचार विचारांनी लक्षावधी माणसे स्वत:ला विसरुन नाम गजर करीत वाटचाल करतात.पंढरपूरची वारी ही प्राचीन काळापासून सुरू आहे. पालखी सोहळ्यास ज्यांनी आरंभ केला ते श्री गुरुहैबत बाबा हे आरफळ (ता. सातारा) या गावचे होते. त्यांचे घराणे जसे शूर तसेच धार्मिक वृत्तीचे होते. आपल्या माता -पित्यांच्यासोबत बाबांनी पंढरीची वारी केली होती. माऊली मोठ्या थाटाने सनई, चौघडा, घोडेस्वार, चोपदार, छत्रचामर, रथ यासह मोठ्या वैभवाने दिमाखात चालत आहे.

पंढरीची पायी वारी केल्याने संसार व्यापातून थोडे दिवस तरी मुक्‍तपणे वेगळ्या शाश्‍वत आनंदाची अनुभूती घेता येते. त्यागी वृत्तीने ईशसेवा घडते. भौतिक, व्यावहारिक जीवन जगताना वासना व विकार यातून उद्भवणारे मालिन्य नष्ट होते. निसर्गाशी एकरुप जवळीक साधता येते. विविधतेचे दर्शन घडते. मन वाचा, काया, पवित्र होऊन कायिक वाचिक, मानसिक तप लाभते. संसार, दु:खे सहन करण्याचे सामर्थ्य प्राप्‍त होते. विविध भागांतील वेगवेगवेळ्या थरातील भिन्‍न स्वभावांच्या लोकांशी संपर्क येऊन निरीक्षण शक्‍ती लाभते. सृष्टीमध्ये चराचरात, कणाकणात वास करणार्‍या ईश्‍वर भेटीच्या प्रवाहात जीवनाची धन्यता अनुभवता येते.

पालखी सोहळा प्रत्येक गावातून जात असताना त्या गावातील प्रत्येकाच्या मनात ज्ञानेश्‍वर माऊली आपल्या गावात, आपल्या दारात येते, अशी भावना व श्रद्धा असते. ‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ आपल्या गावात संतांच्या रुपाने आलेल्या लाखो वारकर्‍यांच्या स्वागताला व आदरातिथ्याला प्रत्येकजण आसुसलेला असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे वारकर्‍यांना अन्‍नदान करण्याचा प्रयत्न करतो. या पंढरीच्या वाटेने नुसते ज्ञानोबा, तुकाराम  म्हटले तरी कोणी उपाशी ठेवत नाही व राहत नाही. आळंदी पंढरीचे वारकरी म्हटले तरी लोकांच्या मनात वेगळ्याच प्रकारे आदराची भावना निर्माण होते. आपल्या जीवनामध्ये एकदातरी पंढरीची पायी वारी केल्यास प्रत्यक्ष विठ्ठल भेटल्याचा आनंद वारकर्‍यांप्रमाणे मिळेल.

बदलत्या काळामध्ये पंढरीच्या वारीचे रुपही बदलत गेले आहे. माऊलींचा पालखी सोहळा वाढत चालला आहे. ‘माऊली’ या शब्दांतच सर्वांना सामावून घेण्याची ताकद या वारीच्यानिमित्ताने अनुभवयास मिळते. वारीतील वारकरी आपल्या गावात - घरात यावा याची जणू ओढच वारीच्या वाटेवरील गावकर्‍यांना लागलेली असते. वारीच्या काळात संपूर्ण जीवनच हरिनामाच्या गजरात रंगून जावून माऊलीमय होत असते. असे म्हटले जाते, पंढरपूरची वारी ही प्राचीन काळापासून सुरु आहे. संत ज्ञानदेवांच्या अगोदरपासून वारीची परंपरा  सुरु  आहे. श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज, विश्‍वसंत श्री संत तुकाराम महाराजांचे मुळ पुरुष विश्‍वंभर बाबा यांनीही वारी चालवली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांनी सर्व विखुरलेला वैष्णव समाज एकत्र करुन त्याला संघटित रुप प्राप्‍त करुन दिले.  श्री संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबुवा यांनी ही वारी सुरु केली. तर थोर भक्‍त गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्ररित्या सुरु केला. 1832 च्या दरम्यान हा सोहळा पालखी स्वरुपात सुरु झाला. सरदार शितोळे यांनी त्यासाठी सहकार्य केले.

लोणंदसहीत सर्वच गावांत पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था टँकर व नळाद्वारे केली जाते. तरी पॅकबंद बाटलीतील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. प्रात:विधीसाठी आता शौचालय, तात्पुरती शौचालय याचा वापर करताना वारकरी दिसतात. लोणंद गावाच्या संपूर्ण परिसरात वारकरी विश्‍वरुप राहतात. त्यामुळे प्रत्येक भागात आवश्यक सुविधा दिल्या जाऊन गावाचा प्रत्येक भाग हा छोटे गाव म्हणून तयार होताना दिसतो आहे. दिंड्याची संख्या वाढलेली असताना ट्रक, टेम्पो, जीप यांचीही संख्या वाढत आहे. त्याचा अतिरिक्‍त ताण वाहतुकीवर व पोलिस यंत्रणेवर येताना दिसतो. तरीही कोणती अडचण न होता सर्व काही सुरळीत चाललेले असते. वारीचे रुप व स्वरुप बदलत चालले असले तरी उत्साह मात्र कमी होताना दिसत नाही. हे सर्व काही माऊली या शब्दांची अनुभूती आहे, हे खरे आहे.

- शशिकांत जाधव, लोणंद