Fri, Apr 26, 2019 15:37होमपेज › Satara › बाप्पा पावला अन् सचिन भेटला!

बाप्पा पावला अन् सचिन भेटला!

Published On: Feb 01 2018 1:39AM | Last Updated: Jan 31 2018 10:56PMसातारा : दीपक देशमुख

किसी चीज को अगर दिलसे चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने की कोशिश करती है। या उक्तीचा प्रत्यय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या सातारकर चाहत्याला आला. क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणारा सचिन प्रत्यक्षात खूप संवदेनशील आहे, हे तर सर्वच जाणतात. जगभर आपल्या असंख्य चाहत्यांच्या प्रेमाची कदर करणार्‍या सचिनने 27 वर्षांपासून त्याचा फॅन असलेल्या स्वप्नील पाटील यास गणेशजयंतीला भेटण्याचे कबुल केलं अन् दोनच दिवसांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी भेट घेवून चांगलं आदरातिथ्य केलं. त्यामुळे ‘बाप्पा पावलां अन् सचिन भेटला असेच उद‍्गार भारावलेल्या स्वप्नीलच्या तोंडून निघाले.

मास्टर ब्लास्टर सचिनच्या फटकेबाजीचं तमाम क्रिकेटविश्‍वाला वेड लावलं आहे. सचिनचे क्रिकेटमध्ये पदार्पण झाल्यापासून स्वप्नील पाटील हाही त्याचा जबरा फॅन बनला. कुठलीही मॅच असू पहायची सोडली नाही. स्वप्नील सांगतो, 1996 च्या विश्‍वचषक स्पर्धेवेळीही मी दहावीत होतो. परंतु, मॅचकडे लक्ष लागल्याने अनेकदा शाळेला दांड्या मारल्या. सचिनची बॅटिंग पाहण्यासाठी 6 वेळा मुंबईला वानखेडे स्टेडियम गाठले. यातील सर्वात उत्कंठावर्धक प्रसंग म्हणजे सचिनने खेळलेली शेवटची मॅच. ती इनिंग संपताच अख्ख्या स्टेडियमवरील प्रेक्षकांनी उभे राहून सचिनला अभिवादन केले. अख्खं स्टेडियम गहिवरून गेेलं होतं. हा प्रसंग मनात कोरून ठेवला असल्याचे स्वप्नील सांगतो. 

दरम्यान, अडीच वर्षांपासून सचिनला सोशल मिडियाच्या माध्यमातून फॉलो करणार्‍या स्वप्नीलला अखेर आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा नंबर मिळालाच. मग संवादही सुरू झाले. एकदा गणेश जयंतीच्या शुभेच्छा देताना स्वप्नीलने  भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सचिननेही गडबडीत  नको, ये निवांत.. भेटू, म्हणून दोन दिवसानंतर वेळ दिली. हरखून गेलेला स्वप्नील आपला भाऊ आणि एका मित्रासमवेत सातारचे कंदीपेढे घेऊन सचिनच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाला.  त्यानंतर सचिन तेंडूलकरने केलेलं आदरातिथ्य पाहून तिघेही भारावून गेले. सव्वा तास ‘कॉफी विथ सचिन’ हा आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय प्रसंग असल्याचे स्वप्नीलने सांगितले. सचिनने त्याची विचारपूस करून गप्पांच्या ओघात आपलेही अनेक अनुभव व किस्से सांगितले. वन-डेतील दोनशे धावांचा किस्सा सांगताना, ती मॅच आपण आजारी असल्याने सुरुवातीला खेळणार नसल्याचे नमूद केले. लाडक्या सचिनला कंदीपेढे देऊन साताराला येण्याचे निमंत्रण देवून स्वप्नील व मित्रांनी त्यांचा निरोप घेतला. गेल्या 27 वर्षांपासून ज्याचे चाहते होतो, त्या विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट झाल्यामुळे  भेट झाल्यामुळे हा ‘जबरा फॅन’ने मात्र, बाप्पा पावला अन् सचिन भेटला, असेच उद‍्गार काढले आहेत.

माझं वजन वाढवायचा विचार आहे का?

भेटीनंतर स्वप्नीलसह तिघांचाही तेथून पाय निघत नव्हता. जाताना सातारी कंदीपेढे व  तुषारने आणलेले गोव्याचे काजू सचिन तेंडुलकर यांना दिले. त्यावर तुम्ही लोकांनी माझं वजन वाढवायचं ठरवलंय का असे मिश्किलीनं म्हणत नेहमीच्या स्टाईलने हात उंचावून त्यांना निरोप दिला.