Tue, May 21, 2019 23:06होमपेज › Satara › सचिन कांबळेचा खून अनैतिक संबंधातून

सचिन कांबळेचा खून अनैतिक संबंधातून

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:16PMकराड : प्रतिनिधी

अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पती सचिन बबन कांबळेचा सुपारी देऊन निर्घृण खून केल्याचा धक्‍कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला. या प्रकरणी पत्नीसह तिचा प्रियकर व त्याचा साथीदार यांना शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री बार्शी येथे अटक केली. अन्य एकाला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. 

आरती सचिन कांबळे (मृत सचिनची पत्नी), तिचा प्रियकर आप्पा ऊर्फ शशिकांत सुरेश भोसले, राहुल समाधान शिंदे (रा. कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर यापूर्वी कुमार पंजाब पाटणकर (रा. कराड) याला अटक करण्यात आली आहे. दि. 30 मे रोजी टेंभू (ता. कराड) रोडलगत सचिन बबन कांबळे याचा गळा चिरून अज्ञात इसमांनी खून केला होता. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सर्व आरोपी निष्पन्न झाले होते. यातील एकास अटक करण्यात आली होती मात्र अन्य तिघे पसार असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर होते. 

गुरूवारी रात्री बार्शी येथे संशयितांना अटक करण्यात आली. संशयित आरोपींनी संगणमत करून सचिनचा काटा काढला. आरती व आप्पा उर्फ शशिकांत भोसले यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधास सचिन हा अडथळा ठरत होता. त्यामुळे आरतीने पती सचिनचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार राहूल समाधान शिंदे व कुमार पाटणकर यांना सुपारी दिली. 

सर्वांनी संगणमत करून दि. 29 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास सचिन कांबळे यास घरातून बाहेर गावी कामास घेवून जाण्याच्या निमित्ताने बोलावून घेऊन त्यास कराड बसस्थानक पाठीमागील देशी दारूच्या दुकानात नेवून दारू पाजली. यानंतर त्यास रिक्षाने ओगलेवाडी पुलापर्यंत नेले. तेथून टेंभूच्या दिशेला एका निर्जन ठिकाणी चालवत नेले. तेथे सचिनला पुन्हा दारू पाजून त्याचा गळा चिरून खून करण्यात आला.

यानंतर चौघे संशयित दोन मोटारसायकल वरून लोणावळा मार्गे ठाणे येथे गेले. तेथे त्यांना ओळखीच्या पाहुण्याचे घर न सापडल्याने त्याच गाडीवरून पुणे येथून बीड, उस्मानाबाद  करून पुन्हा बार्शी येथे गेले. या प्रवासादरम्यान सर्वांनी आपले मोबाईल बंद ठेवले होते. पाटणकर यास दि. 5 जून रोजी अटक करण्यात आली होती. 

शहर पोलिस ठाण्याचे एक पथक अन्य संशयितांच्या मागावर होते. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि. प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे, हवालदार राजेंद्र पुजारी, प्रदीप कदम, सचिन गुरव, योगेश भोसले, महिला पोलिस कर्मचारी वर्षा शिंदे यांचे पथक बार्शी येथे गेले. त्यांनी गुरूवारी रात्री संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 11 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.