Wed, Aug 21, 2019 19:05होमपेज › Satara › महामंडळाचा १ कोटीचा महसूल बुडाला

महामंडळाचा १ कोटीचा महसूल बुडाला

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:41PMसातारा : प्रतिनिधी

मराठा आरक्षणप्रश्‍नी गुरूवारी पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी मध्यरात्रीपासून एकही एसटी आगारातून बाहेर पडली नाही. त्यामुळे  सातारा जिल्ह्यात एसटीची सेवा विस्कळीत झाली. या संपामुळे प्रवाशांना रात्रीपासून गैरसोयीला सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील सुमारे 4 हजारहून अधिक एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्या. त्यामुळे 1 कोटी रुपयांचे महामंडळाचे नुकसान झाले.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी व सार्वजनिक मालमत्तेच्या  सुरक्षेचा विचार करून बुधवारी रात्रीच विविध आगारातून गेलेल्या मुक्कामी बसेस पुन्हा आगारात बोलावण्यात आल्या. तर गुरूवारी पहाटेपासून 11 आगारातून एकही बस बाहेर सोडण्यात आली नाही. मात्र सकाळी 11 च्या सुमारास सातारा बसस्थानकात सातारा बोरिवली ही एकमेव शिवशाही बस मुंबईहून दाखल झाली मात्र या बसमध्येही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रवाशी दिसून आले.सातारा बसस्थानक हे पुणे बंगलोर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक  असल्याने येथे सतत प्रवाशांची गर्दी असते.  गुरूवारी मात्र गजबजलेल्या या बसस्थानकात सगळीकडे शुकशुकाट जाणवत होता.बसस्थानकातील एसटी कॅन्टींगसह परिसरातील  सर्व दुकाने बंद होती.

सातारा आगाराच्या इन गेटसमोर भव्य फाटक लावण्यात आले होते.दरम्यान, पहाटे  5 वाजल्यापासून सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, मेढा, फलटण, कोरेगाव, पारगाव खंडाळा, वडूज व दहिवडी या 11 आगारातून एकही एसटी बस मार्गस्थ झाली नाही. त्यामुळे सुमारे 4 हजारहून अधिक फेर्‍या रद्द झाल्या. दररोज सरासरी सर्व आगाराचे मिळून विभागाला सुमारे 1 कोटी रुपयांचे अपेक्षिंत उत्पन्न मिळते. मात्र संपामुळे एसटीचा महसूल बुडाला.

सरकारी कर्मचार्‍यांचा संप, तसेच पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंदची हाक त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच नसल्याने सर्वत्र शुकशूकाट होता त्यामुळे एसटी महामंडळाने बसेसचे नुकसान होवू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी एसटी बसेस बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. तसेच मागील गेल्या काही आंदोलनात आंदोलकांनी एसटीला टार्गेट केले होते. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सोसावे लागते. या पार्श्‍वभुमीवर महामंडळाने सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 आगारातील एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले.

सिटी बसेसच्या 247 फेर्‍या रद्द

सातारा आगारातून सातारा शहर व परिसरात दररोज पहाटे 5 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुमारे 247 शहर बसेसच्या फेर्‍या होत असतात.मात्र महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभुमीवर  सातारा आगाराने शहरासह ग्रामीण भागातील बससेवा रात्रीपासूनच बंद ठेवली  होती. त्यामुळे सातारा शहर बससेवेच्या सुमारे 247 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. सातारा बसस्थानकासह राजवाडा बसस्थानकावर शुकशुकाट जाणवत होता. महामंडळाच्या कर्मचार्‍याव्यतिरिक्त कोणाही बसस्थानकात नव्हते. या फेर्‍या रद्द झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.