Wed, Jul 17, 2019 00:37होमपेज › Satara › बाहेरील आगाराच्या बसेसचा प्रवाशांना ठेंगा

बाहेरील आगाराच्या बसेसचा प्रवाशांना ठेंगा

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 10:42PMसातारा : प्रवीण शिंगटे 

पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सांगली, कोल्हापूर, कोकण व अन्य विभागातील बसेसनी प्रवाशांना सातारा बसस्थानकात घेवून येण्यास असमर्थता दर्शवल्याने  प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ज्या आगाराच्या बसेस सातारा बसस्थानकात येत नाहीत, अशा बसच्या चालक व वाहकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.

पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गा-वरील सातारा बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्यामुळे या बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण, विजापूर, कर्नाटक, बेळगाव, गोवा राज्यासह बाहेरील राज्यातील बसेसची सातारा बसस्थानकात ये जा असते. 

गेल्या काही दिवसापासून पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. त्यामुळे  सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक वळवली आहे.वाहतुकीत बदल केल्यानंतर कोल्हापूर ते मुंबई व पुणे  मार्गावर धावणार्‍या बसेस सातारा बसस्थानकात यायच्या बंद झाल्या. सातारा शहरात येणार्‍या  काही बसेस या वाढे फाटा येथून सातारा बसस्थानकात ये-जा करत  होत्या मात्र, त्याही बसेस सातारा बसस्थानकात येत नाहीत.

अनेक प्रवाशांनी सातार्‍याची तिकीटे काढली मात्र त्यांना वाढे फाटा येथे  एसटी चालक वाहक उतरून रिक्षाने जा असा सल्ला देत आहेत. त्यावरून अनेकदा एसटी चालक, वाहक व प्रवाशांची वादावादी होताना दिसत आहे. काही वेळा तर एकमेकावर धावून जाण्याचे प्रसंग घडले आहेत.

स्वारगेट बसस्थानकावर कोल्हापूर, सांगली व कोकणात जाणार्‍या बसेसमध्ये सातार्‍यामधील प्रवाशी बसल्यास संबंधित बसचे चालक व वाहक प्रवाशांनो एसटी सातारा बसस्थानकात जाणार नाही, अशी उध्दट उत्तरे करताना दिसत आहेत. त्यामुळे सातार्‍याचा प्रवास कसा करावयाचा असा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. अनेकदा स्वारगेट बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकाकडे तक्रार करण्यास प्रवाशी गेल्यास संबंधित बसच्या चालक व वाहकांना एसटी सातारा स्थानकात नेण्याबाबत समज दिली जाते. मात्र, काही चालक संबंधित अधिकार्‍याचे ऐकत नाहीत. आपला मनमानी कारभार करत असतात. त्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

सातारा बसस्थानकात बसेस येत नसल्याने दररोज पुणे, शिरवळ,  खंडाळा, भुईंज, पाचवड, कराड, कोल्हापूर असा प्रवास करणार्‍या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सातारा विभागाच्या विभाग नियंत्रकपदाची सुत्रे नुकतीच सागर पळसुले यांनी स्वीकारली असून सातारा बसस्थानकात ज्या आगाराच्या बसेस येत नाहीत, अशा चालक वाहकांवर कारवाई करावी अन्यथा प्रवाशांना मोठे आंदोलन उभारावे लागेल असा इशारा प्रवाशांनी दिला आहे. 

वाढे फाटा येथे एसटीच्या जबाबदार अधिकार्‍यांची नियुक्ती करून त्या ठिकाणी सातारा बसस्थानकाकडे बसेस घेवून  जाण्याच्या सूचना कराव्यात तसेच  चालक वाहकांना बसची नोंदणी सातारा बसस्थानकात  सक्तीची केली तर दररोज किती बसेस सातार्‍यात आल्या हे माहित होणार आहे. ज्या बसेस बसस्थानकात आल्या नाहीत अशा बसच्या चालक व वाहकांवर एसटीच्या मुख्य कार्यालयाकडे कारवाईचा अहवाल पाठवावा. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता नूतन विभाग नियंत्रकांनी घ्यावी.